कोल्हापूर : केरळच्या पूरग्रस्तांसाठी केलेल्या मदतीसह अन्य क्षेत्रांत विविध उल्लेखनीय काम केलेल्या कोल्हापुरातील सातजणांना ‘उडान’ फौंडेशनने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीचिन्ह देऊन गौरविले. ‘तुम्ही चांगली सेवा करा; मी तुमच्या पाठीशी आहे,’ असे गौरवोद्गार करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी यावेळी काढले. ते उडान फौंडेशनच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात बोलत होते.यावेळी कोल्हापूर कार्यालयाचे धर्मादाय आयुक्त शशिकांत हेरलेकर, उपायुक्त प्रदीप चौधरी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. ‘चेतना’ गतिमंद संस्थेचे प्राचार्य पवन खेबुडकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी घालून शाहूू स्मारक भवनात झाली.यावेळी सूरज गुरव म्हणाले, कोल्हापूरने वेगवेगळ्या क्षेत्रांत ठसा उमटविला आहे. कोल्हापुरात ‘माणुसकीच्या भिंती’ला चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामध्ये कपडे नेणाऱ्यांची संख्या जास्त होती. कोल्हापुरात ‘उडान’सारख्या बऱ्याच स्वयंसेवी संस्था आहेत. आजचा कार्यक्रम हे ‘उडान’चे कौतुकास्पद काम आहे.यावेळी सेकंड इनिंग होम संस्थेचे किशोर नैनवाणी, प्राजक्ता चव्हाण, अभिनंदन मोरे, अनिता घाटगे, फराकटेवाडीच्या सरपंच शीतल फराकटे, २०१८ सौंदर्यसाम्राज्ञी सोनाली रजपूत व तेजस्विनी आरगे, मोनू सूर्यवंशी यांना ‘उडान’चे प्रशस्तीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी अनिता घाटगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उडान फौंडेशनचे अध्यक्ष भूषण लाड यांनी, फौंडेशनने केलेल्या कामाचा आढावा सांगितला. यावेळी संध्या लाड, चेतन घाटगे यांच्यासह फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.