कोल्हापूर : पाण्याचा वापर जपून केला तर शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी होईल आणि पर्यायाने पर्यावरणालाही हानी पोहोचणार नाही. म्हणून हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या ग्राहकांना पाण्याचा वापर कमीत कमी करण्यास सांगावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी रात्री शहरातील हॉटेलमालक व्यावसायिकांच्या बैठकीत केले.महानगरपालिका प्रशासनाने शहरात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. एकीकडे जनजागृती आणि दुसरीकडे लोकांच्या सहभागातून नाले, उद्याने, शहर स्वच्छ करण्याची मोहीम राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी रात्री हॉटेल अॅट्रिया येथे आयुक्त कलशेट्टी यांनी कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन मार्गदर्शन केले.हॉटेलमध्ये निर्माण होणाऱ्या दैनंदिन ओल्या व सुक्या कचऱ्यांचे व्यवस्थापन तसेच प्लास्टिकबंदी याबाबत घ्यायची खबरदाररी याविषयी माहिती आयुक्त कलशेट्टी यांनी बैठकीत सांगितली. हॉटेलमध्ये पाण्याचा वापर कमीत कमी प्रमाणात करण्यात यावा; यामुळे सांडपाणी कमी प्रमाणात तयार होईल व महानगरपालिकेस कराव्या लागणाऱ्या सांडपाणी निर्गतीकरणाची समस्या कमी होईल. या वर्षी सांडपाणी तयार होण्याचे प्रमाण ९५ द.ल. लिटरवरून ८५ द.ल. लिटर करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे आयुक्तांनी सांगितले.पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व हॉटेलमालकांनी पंचगंगा नदी प्रदूषण रोखणेकामी आवश्यक माहिती संकलित करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन केले. अनिल चौगले यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.यावेळी आरोग्यधिकारी दिलीप पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष सचिन शानभाग, सेक्रेटरी सिद्धार्थ लाटकर, जॉइंट सेक्रेटरी आशिष रायबागे, बाळ पाटणकर, शंतनू पै, शेखर काळे, श्रीकांत पुरेकर, राजू माळकर, नकुल पाटणकर, उमेश राऊत, अरुण भोसले (चोपदार), दिलीप पवार, अमरजा निंबाळकर यांच्यासह अनेक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.