संदीप बावचे ।शिरोळ : कारखान्याच्या ४२ वर्षांच्या इतिहासात मागील निवडणुकीत प्रथमच श्री दत्त साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या २७ जुलैला मतदान होणार आहे.
माजी आमदार स्व. सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. कारखान्याच्या माध्यमातून विश्वस्त म्हणून काम करीत असताना सामाजिक विकास, वैचारिक परिवर्तन व उत्कृष्ट प्रशासनाची सांगड घालून सा. रे. पाटील यांनी काम केले होते. तीच शिदोरी घेऊन दत्त उद्योग समूहातील गणपतराव पाटील यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक मल्टिस्टेट म्हणून कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, चिकोडी, अथणी तालुक्यांतील सभासदांचा यात समावेश आहे. सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर दत्त उद्योग समूहाची धुरा गणपतराव पाटील यांच्याकडे आली आहे. शेतकरी व कामगार या दोन घटकांना बरोबर घेऊन गणपतराव पाटील यांनी गेल्या चार वर्षांत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.
नवनवीन प्रयोग करून क्षारपड जमीन सुधारणा, सेंद्रिय ऊस शेती, एकरी २०० टन ऊस उत्पादन यासह अनेक प्रभावी योजना कारखान्याच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत.२१ संचालक मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष्य लागले आहे.
ऊसदराच्या प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेहमीच दत्त विरोधी भूमिका घेतली होती. मात्र, सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या शोकसभा कार्यक्रमात माजी खासदार राजू शेट्टी यांनी सा. रे. पाटील यांच्यासोबत आपले केवळ वैचारिक मतभेद होते, असे सांगितले होते. दरम्यान, कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, विरोधी गटाकडून पॅनेलसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, विरोधी पॅनेलसाठी कोणता गट पुढे येणार, हे देखील महत्त्वाचे आहे. केवळ विरोधाला विरोध म्हणून विरोधी गटाकडून पॅनेल लावण्याचीही तयारी सुरू झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही गटाकडून अजून निवडणूक लढविण्याची घोषणा झालेली दिसून येत नाही.
मागील निवडणूक बिनविरोध करून सा. रे. पाटील यांनी दत्तवरील आपले वर्चस्व सिद्ध करून दाखविले होते. त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दत्तच्या निवडणुकीकडे लक्ष्य केंद्रीत झाले आहे.इच्छुकांकडून फिल्डिंगसा. रे. पाटील यांच्यासह ज्येष्ठ संचालक युसूफसाहेब मेस्री, खेमा कांबळे यांच्या निधनाने या रिक्त जागांवर उमेदवार म्हणून कोणाला संधी मिळणार, याबाबत आतापासूनच उत्सुकता लागून राहिली असली, तरी सत्ताधारी गटाकडून आपल्याला संधी मिळावी, यासाठी अनेक इच्छुकांकडून फिल्डिंग लावली जात आहे. एकूण २१ संचालक निवडले जाणार असून, २७ हजार २०५ सभासद मतदानास पात्र आहेत.