इचलकरंजी : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कोल्हापूरनंतर इचलकरंजीतील दुसऱ्या क्रमांकाची मतदारसंख्या पाहता या निवडणुकीतील दोन्ही मातब्बर उमेदवारांनी येथे लक्ष केंद्रित केले आहे. शुक्रवारी आमदार महादेवराव महाडिक, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वासराव पाटील, आदींनी इचलकरंजीतील प्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या. कॉँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या जवाहर साखर कारखान्यावरील भेटीचा परिणाम आवाडे यांची उमेदवारी मागे घेण्यामध्ये झाला. या राजकीय कलाटणीमुळे इचलकरंजी शहराच्या राजकीय क्षेत्रात मात्र चांगलीच खळबळ माजली. कॉँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणारे पी. एन. पाटील हे निवडणूक रिंगणात नाहीत, तर आवाडे व आमदार महाडिक हे निवडणुकीसाठी उभे असताना महाडिक यांच्याकडून आवाडेंना पाठिंब्याची आॅफर सलग दोन दिवस देण्यात आली. या पार्श्वभूमीवर आणि अचानकपणे आवाडेंनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत गोकुळचे अध्यक्ष पाटील, सुनील मोदी, सुनील कदम, आदींनी इचलकरंजीतील वेगवेगळ्या पक्षांचे पक्षप्रतोद व प्रमुखांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करीत वाटाघाटी केल्या. त्याचबरोबर अरुण नरके, रणजित पाटील यांनीही येथील काही नगरसेवकांना भेटून त्यांच्याशी बोलणी केली. (प्रतिनिधी)
इचलकरंजीवर लक्ष केंद्रित
By admin | Published: December 13, 2015 1:28 AM