लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात अनेक अडचणी येत आहेत. वीज पुरवठा नसणे, नेटची सेवा मध्येच बंद पडणे, सर्व्हरचा स्पीड कमी असणे, या समस्या येत आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरतेवेळी हस्तलिखीत प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आजरा तालुका शिवसेनेच्यावतीने तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.
राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यात आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरणे आजरा तालुक्यातील इच्छुक उमेदवारांना शक्य नाही. तालुक्यातील अनेक गावांमध्ये इंटरनेटची रेंज नाही. विद्युतपुरवठा खंडित होतो, तसेच ऐनवेळी सर्व्हरला स्पीड मिळत नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया वेळेत होत नाही. या प्रक्रियेचा इच्छुक उमेदवारांना त्रास होत आहे. ऑनलाईनऐवजी सदरची प्रक्रिया हस्तलिखीतप्रमाणे सुरू व्हावी. याबाबत जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाला मेलद्वारे माहिती देऊन हस्तलिखीत प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मागणीचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले. निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत, उपतालुकाप्रमुख संजय पाटील, संजय सावंत, विजय थोरवत, कोरीवडे उपसरपंच दत्ता पाटील यांच्या सह्या आहेत.