: आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू
कसबा बावडा : कसबा बावड्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र असून नागरिकांनी संचारबंदीच्या काळात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे. कसबा बावड्यात १ ते ६ प्रभागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल ८५ च्या घरात पोहचली आहे. आतापर्यंत ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या दररोज एक-दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, आतापर्यंत कसबा बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ हजार ९९० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
सध्या बावड्यात ज्या ठिकाणी रुग्ण सापडतो तो परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात येत आहे. याशिवाय भाजी मार्केटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली आहे. भाजी मंडईतील बहुतेक सर्व विक्रेत्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे.
बावड्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरी नागरिकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य दिसत नसल्याचे वास्तव आहे. संचारबंदीच्या काळातही मुख्य रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनीच नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे. दरम्यान, सध्या कोल्हापुरातून रोज चार ते पाच मृतदेह बेडअभावी अंत्यसंस्कारासाठी बावडा स्मशानभूमीकडे पाठवले जात आहेत. त्याचा ताण या स्मशानभूमीवर पडत आहे.
चौकट :
शनिवार-रविवारचा आठवडा बाजार रद्द कसबा बावडा भाजी मंडई येथे दर रविवारी आठवडा बाजार भरतो. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता शनिवार व रविवारी असे सलग दोन दिवस बाजार बंद करण्यात आला आहे.
चौकट:
दोन दिवसांत बावडा कोविड सेंटर सुरू
कसबा बावडा पॅव्हिलियन हॉल येथे ४६ बेडचे कोविड सेंटर उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दोन दिवसांत ते सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, कसबा बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण करण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे.