विनायक शिंपुकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : अन्नदानासारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही. सर्व दानात श्रेष्ठ अन्नदान आहे. भुकेलेल्याला अन्न देणे हे पुण्याचे कार्य मानून शहर व परिसरातील अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांकडून गरजूंना अन्न देण्याचे कार्य सुरू आहे. वाढत्या कोरोना महामारीला रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी आहे. या संचारबंदीमुळे गोरगरिबांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला असला, तरी सामाजिक संस्था आणि संघटना त्यांच्या मदतीला धावत आहेत.
माणुसकीचा धर्म वाढविण्यासाठी माणुसकी फाउंडेशन, व्हिजन इचलकरंजी, सकल जैन समाज व बिझनेस पॉईंट ग्रुप यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोनामुळे सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंट बंद आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना कामही नाही, त्यामुळे खायचे काय, हा प्रश्न डोळ्यांसमोर उभा आहे. अनेकजण शहरात भिक्षा मागून आपल्या पोटाची खळगी भरत आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत भिक्षाही मिळणे कठीण झाले आहे. अशात इचलकरंजी शहरातील या स्वयंसेवी संस्था अन्न पुरवठा करण्याचे कार्य करीत आहेत.
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असून, या ठिकाणी कामगारांची संख्या लक्षणीय आहे. तसेच परप्रांतीय कामगारही मोठ्या संख्येने राहतात. लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे हातावरचे पोट असलेल्यांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कोरोना महामारीच्या काळात कोणाचीही जेवणासाठी उपासमार होऊ नये, याची दक्षता घेत सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अनेक संस्थांनी अन्नासाठी भुकेलेल्यांना मोफत जेवणाची सोय केली आहे.
काही संस्थांनी यापुढेही जाऊन घरपोहोच डबा देण्याची सोय उपलब्ध केली आहे. या सर्व कार्याबद्दल समाजामधून त्यांचे कौतुक होत आहे. तसेच शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ही निश्चितच शहरासाठी कौतुकाची बाब आहे.
चौकट
घरपोहोच व कोविड केंद्रावरही सुविधा
जे लोक निराधार आहेत, घरामध्ये कर्ता व्यक्ती नसल्यामुळे जेवणाची व्यवस्था होत नाही, त्यांना घरपोहोच जेवण दिले जाते. तसेच कोविड केंद्रामधील कोरोना रुग्णाचे नातेवाईक बाहेरगावाहून येत असतात. त्यांच्यासाठी केंद्रावर जेवण देण्याची सोय करण्यात आली आहे.