कोल्हापूर : जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी सहज सेवा ट्रस्टच्याने ८ ते ११ तारखेदरम्यान गायमुख येथे अन्नछत्राची सोय केली आहे. या कालावधीत किमान अडीच लाख भाविकांची तहानभूक भागविण्याची सोय केल्याची माहिती विश्वस्त सन्मती मिरजे यांनी मंगळवारी येथे कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतील भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री जोतिबा देवाच्या यात्रेस लाखो भाविक येतात. त्यांच्या सोयीसाठी गेल्या सोळा वर्षांपासून सहज सेवा ट्रस्टच्यावतीने अन्नछत्र चालविले जाते. याशिवाय बैलांसाठी पेंड आणि रक्तदान शिबिर असे उपक्रमही घेतले जातात. यात्रा काळात पाऊस न पडल्यास दोन लाख भाविक अन्नछत्राचा लाभ घेतील, असा अंदाज आहे.भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी गेल्या महिन्याभरापासून तयारी सुरू आहे. यासाठी ५० कार्यकर्ते राबत आहेत. यंदाही अनिल काटे यांच्यातर्फे अन्नछत्रासाठी १५ हजार चौरस फुटांच्या मांडवाची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर महिला भाविकांसाठी स्वच्छतागृहाची सोय असणार आहे. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त प्रमोद पाटील, सूर्यकांत गायकवाड, किरण शहा, अरविंद परमार, लक्ष्मण पटेल उपस्थित होते. रात्रंदिन सेवा...शनिवारी (दि.८) सकाळी ८ वाजता अन्नछत्र सुरु होईल. ते ११ तारखेला शेवटचा भाविक डोंगरावरून निघेपर्यंत सुरु राहील. त्याशिवाय प्रशासनातील व विविध सामाजिक संस्थांच्या सुमारे दोन हजार लोकांना नाष्ट्यासह जेवण पाकिटातून पोहोच केले जाते.मदतीचे आवाहन..या सामाजिक उपक्रमास खर्चही मोठ्या प्रमाणात येतो तरी ज्या व्यक्तींना मदत करावयाची असेल त्यांनी बसंत-बहार टॉकीजसमोरील आशिष चेंबर्समधील सहज सेवा ट्रस्टशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. असे असेल जेवण..मसाले भात, शेवग्याच्या शेंगेची आमटी, शिरा आणि राजमा,मूगाची उसळ किंवा वांगी व बटाट्याची भाजी. उपवास असलेल्या भाविकांसाठी खिचडी असेल. त्याशिवाय चहा व दुपारी उन्हाच्या रखात तहान भागविणारा मट्टा असेल.बैलांसाठी पेंड आजही अनेक भाविक बैलगाड्या घेऊन यात्रेसाठी येतात. यात्रा कालावधीत या मुक्या प्राण्यांचे वैरणीअभावी हाल होऊ नयेत यासाठी चांगल्या प्रतीच्या शेंगदाण्याची कपरी पेंड ट्रस्टतर्फे देण्यात येते. त्यासाठी १२०० किलो पेंड छोट्या पिशव्यांमध्ये भरण्याचे काम चालू आहे.
अडीच लाख भाविकांचे अन्नछत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2017 12:56 AM