कोल्हापूर : ‘कोरोना’बाबत दक्षतेची उपाययोजना म्हणून धान्ये, किराणा, भाजीपाला आणि औषधांची घरपोच सेवा उपलब्ध झाली आहे. राजारामपुरी, कसबा बावडा, आदी परिसरामध्ये संबंधित सुविधेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावर येणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.जनता कर्फ्यूनंतर २१ दिवसांच्या लॉकडाऊनची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु झाली. मात्र, धान्ये, किराणा साहित्य, भाजीपाला, औषधांसाठी लोक हे घराबाहेर पडले. त्यांना अत्यावश्यक सेवा घरपोच देवून त्यांचे रस्त्यांवरील प्रमाण कमी करण्यासाठी राजारामपुरी, कसबा बावडा, आदी परिसरातील काही सामाजिक संस्था, संघटना आणि अत्यावश्यक सेवेतील विक्रेते, व्यावसायिकांनी घरपोच सेवा देण्याचा उपक्रम सुरु केला. राजारामपुरीत ‘सेवेचा कोल्हापुरी पॅटर्न’ या नावाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात औषधे, धान्ये व किराणा साहित्य, भाजीपाला व फळे, बेकरी उत्पादने आणि नारळपाणी हे घरपोच दिले जात आहे.
ही सेवा विविध ३४ व्यावसायिक, विक्रेते देत आहेत. कसबा बावडा परिसरात किराणा आणि औषध दुकाने प्रत्येकी सहा, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विक्रेते सेवा देत आहेत. वायपी पोवारनगरमध्ये प्रतिक शिंदे यांच्याकडून घरपोच भाजीपाला देण्यात येत आहे. शहरासह जिल्ह्यात गॅस सिलेंडर हे डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून घरपोच देण्यात येत आहे. मोरेवाडी (ता. पन्हाळा) येथील कुमार मोरे हे रक्त-लघवी तपासणीबाबतची सेवा पुरवित आहेत. ‘लॉकडाऊन’मध्ये या घरपोच सुविधांमुळे नागरिकांना मोठी मदत होत आहे.