कोल्हापूर : अंगावर उडणारे पाण्याचे फवारे... बैलगाडीतून अनोखी सफारी... पपेट शो... कठपुतळीचा खेळ... अशा उत्साही वातावरणात रमणमळा येथील वॉटर पार्क येथे मुलांनी ‘फुल्ल टू धमाल’ उडवून दिली. निमित्त होते लोकमत ‘बाल विकास मंच’ सदस्यांसाठी आयोजित ‘फन फेअर इन ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क’चे.मनोरंजनातून शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास साधणाऱ्या आणि बालमनाचा सच्चा सवंगडी असलेल्या लोकमत ‘बाल विकास मंच’च्या सन २०१९-२० च्या सदस्यांसाठी या ‘फन फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. शाळा सुरू असल्याने अभ्यासाच्या चक्रात मुले गढून गेली; पण या बालचमूंना बुधवारी घोडेस्वारी, बैलगाडी सफारी, वॉटरगेम, जादूचे प्रयोग, कठपुतळीचे खेळ अशा धम्माल कार्यक्रमांची मेजवानी देत लोकमत ‘बाल विकास मंच’ने त्यांचा दिवस संस्मरणीय केला. या बालचमूंसोबत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत पालकांनीही सहभागी होत धमाल उडवून दिली.सकाळी ११ वाजता या ‘फन फेअर’ला सुरुवात झाली. प्रारंभी कठपुतळी डान्स पाहून बालचमू हरखून गेले. या कार्यक्रमामुळे काही काळ राजस्थानी संस्कृतीची अनुभूती मिळाली. त्यानंतर जादूचे विविध प्रयोग सादर करून बालचमूंना आश्चर्यचकित केले. प्रत्येक शोनंतर पडणाऱ्या टाळ्या, ‘वन्स मोअर’ची मागणी, स्टेजवर येण्यासाठी बालचमंूच्या होणाºया धावपळीमुळे कलाकारांनाही प्रयोग सादर करताना हुरूप येत होता.त्यानंतर खरी धमाल उडाली ती म्हणजे ‘कोणतेही खेळ मनसोक्त खेळा’ अशी परवानगी मिळताच मुले सर्व प्रकारच्या खेळांमध्ये भान हरपून दंग झाली. या ठिकाणी असलेल्या विविध गेममध्ये सहभागी होत मुलांनी मनसोक्त आनंद लुटला. पाण्यात मनसोक्त डुंबून झाल्याने कडकडून भूक लागल्यावर या ठिकाणी असलेल्या खाद्यांच्या स्टॉलवर भेळ, पाणीपुरी, डोसा, नूडल्स अशा चटपटीत पदार्थांवर विद्यार्थ्यांसह पालकांनीही ताव मारला. ट्रेनची सफर, घोडेस्वारी, सूरपारंब्या अशा विविध खेळांचा आनंद विद्यार्थ्यांनी मनसोक्त लुटला.मनसोक्त पाण्यातघरी जरा पाण्याची चावी सुरू केल्यानंतर ओरडणारे आई-बाबा आज मुलांसोबत स्वत: पाण्यात मनसोक्त डुंबत असल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता. पालकांनी मुलांसोबत पाण्यातील विविध खेळ खेळले.अनोखी सफरीआधुनिक युगात अनेक वाहने काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत. त्यांमधीलच एक वाहन म्हणजे बैलगाडी होय. अनेक मुलांनी ही बैलगाडी फक्त चित्रात किंवा टी.व्ही.मध्ये पाहिली आहे. मात्र, सदस्यांसाठी खास बैलगाडी सफारीचे नियोजन या ठिकाणी केले होते. या बैलगाडीच्या सफारीने मुलांचा आनंद द्विगुणितझाला. आपल्या मुलांच्या अनोख्या सफरीचे फोटो मोबाईलमध्ये काढण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती.