कोल्हापूर : स्वतंत्र भारताला १९५२ साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी पहिले वहिले कांस्यपदक मिळवून दिले. या दुर्मिळ क्षणांची अर्थात पदक वितरण समारंभाची चित्रफीत ७१ वर्षांनी रविवारी जागतिक ऑलिम्पिक संघटनेने प्रसारित केली. या चित्रफितीचे स्वागत भारतातील तमाम कुस्ती शौकिनांनी समाजमाध्यमांमध्ये केले आहे.भारताला १९५२ च्या हेलसिंकी येथे झालेल्या कुस्तीत पहिले वहिले वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक मिळवून देण्याची कामगिरी करणारे खाशाबा जाधव हे एकमेव महाराष्ट्रीयन होते. कराड तालुक्यातील गोळेश्वर असलेले खाशाबांना केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार मिळाला नाही.मात्र, जागतिक ऑलिम्पिक संघटनेने त्यांना पदक वितरित करतानाची चित्रफीत जारी करून मोठा सन्मान दिल्याची भावना कुस्ती शौकिनांकडून व्यक्त होत आहे. या चित्रफितीत खाशांबा जाधव (कांस्य) यांच्यासह सुवर्णपदक विजेता मल्ला शोहासी इही (जपान) व रौप्य पदक विजेता मल्ला रशीद मामाडेयों (सोवियत रशिया) हेही दिसत आहेत.
प्रथम गुगलने वडिलांचे डुडल ठेवून सन्मान केला. त्यानंतर जागतिक ऑलिम्पिक संघटनेने पदक वितरणाची चित्रफीत जारी करून वडिलांचा जागतिक स्तरावर सन्मान केला. त्यांच्या बाॅडी लँग्वेजचा अभ्यास आताच्या मल्लांना त्यामुळे करता येणार आहे. याशिवाय खाशांबावरील चित्रपटातही अचूकता येईल. या चित्रफितीबरोबरच स्पर्धेचीही चित्रफीत जारी करण्याची मागणी आम्हा कुटूंबियांतर्फे केली आहे. - रणजित जाधव, खाशाबा जाधव यांचे चिरंजीव