कोल्हापूर : गांधी मैदान, शिवाजी पेठ येथील ‘के. एस. ए.’चे पंच, फुटबॉल व हॅन्डबॉलचे प्रशिक्षक राहुल नंदकुमार तिवले (वय- ४४) यांचे गुरुवारी लेप्टोस्पायरेसीसच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी आहे. तत्कालीन बलभीम बँकेचे संचालक नंदकुमार तिवले यांचे ते चिरंजीव तर माजी उपमहापौर विक्रम जरग यांचे ते थोरले जावई होत.दोन दिवसांत होत्याचे नव्हते व्हावे याचेच प्रत्यंतर या मृत्यूने तिवले-जरग कुटुंबियांना आले. त्यांच्या कुटुंबियांची जत्रा शुक्रवारी होती. म्हणून राहुल हे पै-पाहुण्यांना बुधवारी रात्री उशिरापर्यंत फोन करत होते. त्याचदरम्यान ताप आल्याचे निमित्त झाले, उलटी झाली म्हणून त्याच दिवशी रात्री रुग्णालयात दाखल केले आणि चोवीस तासांतच त्यांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. खासगी रुग्णालयाने हा मृत्यू लेप्टोस्पायरेसीसने झाल्याचे स्पष्ट केले. महापालिकेकडे संबंधित रुग्णालयाने त्याची माहिती दिलेली नाही; परंतु तरीही दक्षता म्हणून त्या परिसरात आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे महापालिकेचे आरोग्याधिकारी प्रकाश पावरा यांनी सांगितले. राहुल यांना मधुमेहाचा विकार होता. लेप्टोची लागण झालेल्या प्राण्याच्या लघवी किंवा दूषित विष्ठेशी व्यक्तीच्या जखमेचा संसर्ग झाला तर त्यातूनच या रोगाची लागण होते. शक्यतो पावसाळा किंवा दलदलीच्या भागात त्याचा धोका जास्त असतो. मागच्या आठवड्यात गांधी मैदानाचे सांडपाण्यामुळे तळे झाले होते. त्यातून काही संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोल्हापुरातील फुटबॉल पंचाचा लेप्टोस्पायरेसीसने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 12:51 IST