सचिन यादवकोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे ५ डिसेंबरपासून फुटबॉल हंगामासाठी खेळाडू आणि संघाची नोंदणीची सुरुवात होत आहे. नोंदणी आणि नियमावलीची कागदोपत्री प्रक्रिया व्यवस्थित पार पडत असली तरी स्पर्धेत हुल्लडबाजी करणारे खेळाडू, संघ आणि संयोजकांच्यावर कारवाई कोण करणार, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. गत स्पर्धेतील संघाचे ‘मानांकन’ कोणते निश्चित केले जाणार आहे, याबाबतही अद्याप निर्णय जाहीर नाही. संघासाठी केएसएची आदर्श आचारसंहिताही यंदा कागदावरच राहणार की कारवाई करणार, याकडेही फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.
स्पर्धेसाठी स्थानिक आणि परदेशी खेळाडूंची नोंदणीची प्रक्रियेला सुरुवात होत आहे. मात्र काही विशिष्ट संघाकडून नियम धाब्यावर बसविले जातात. पंचांना आणि केएसच्या पदाधिकाऱ्यांना अरेरावी आणि शिवीगाळ केली जाते. मात्र त्यासंदर्भात केएसएकडून फुटकळ कारवाई केली जाते, मात्र गांभीर्याने कारवाई होत नाही. अनेकदा अनेक तरुण मंडळाचे अध्यक्ष, परिसरातील दादा, काही पोलिस कर्मचारी कारवाई रोखण्यासाठी हुल्लडबाजी करणारे खेळाडू, संघ आणि समर्थकांना पाठीशी घालतात.
संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था आयोजित शिव-शाहू चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना ८ एप्रिल, २०२४ छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवाजी तरुण मंडळविरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ या तुल्यबळ संघात झाला. या सामन्यात पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत अर्वाच्य शिवीगाळ, अश्लील हावभावांसह हुल्लडबाजी झाली. मैदानात खेळाडू व प्रेक्षक गॅलरीत शेकडो समर्थक एकमेकांना भिडले. मोठी धावपळ आणि चेंगराचेंगरी झाली. दगड, चप्पल आणि पाण्याच्या बाटल्यांची फेकाफेकीत तणावपूर्ण वातावरण बनले. प्रेक्षक गॅलरीतील स्लॅबच्या सिमेंट व विटांचे तुकडेही मैदानावर भिरकाविले. दगडफेकीत काही जण जखमी झाले. मैदानाबाहेरही धावपळ आणि वाहनांची मोडतोड झाली. अखेर पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
२५ जणांवर गुन्हा दाखलशिवाजी तरुण मंडळविरुद्ध पाटाकडील तालीम संघात झालेल्या सामन्यातील वादाप्रकरणी चौघा खेळांडूसह अनोळखी २५ जणांविरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
‘त्या’ संघाचा निर्णय प्रलंबितकोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने सांगितले की, या प्रकरणातील दोन्ही संघातील निर्णय अद्याप प्रलंबित ठेवला आहे. त्यासंदर्भात संयोजकांनी दोन्ही संघांना त्यांचा निर्णय कळविला आहे. संघाच्या मानांकनाबाबत नियमानुसार प्रक्रिया राबविली जाणार आहे.
कारवाई कधी?फुटबॉल सामन्यातील राड्यातीलमुळे फुटबॉल सामना स्थगित करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला होता. केएसए व सॉकर रेफ्री असोसिएशनच्या निर्णयानंतर सामना खेळविण्याचा निर्णय झाला होता. जुना बुधवार पेठ संघाने दोन्ही संघाना निर्णय कळविला आहे. मात्र तो दोन्ही संघांना अमान्य आहे. हुल्लडबाजीप्रकरणी दोषी खेळाडू आणि समर्थकांवर कारवाईची प्रतीक्षा फुटबॉलप्रेमींना आहे.