कोल्हापूर : शिवसेनेतील बंडामुळे एकीकडे राज्य ढवळून निघाले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मात्र काल, शुक्रवारी दिवसभर कोल्हापुरात होते. आज, शनिवारी सकाळी त्यांनी राज्यसभा आणि विधानपरिषदेतील यशाबद्दल अंबाबाईला साडी, चोळीची ओटी भरून ते पुण्याला रवाना झाले. मात्र त्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अतिशय सावध भूमिका घेतली होती.पाटील यांनी सकाळीच पत्नी अंजली यांच्यासह अंबाबाई मंदिर गाठले. ओटी भरून अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पूर्वी मी कोल्हापुरात असताना ऑफिस संपले की अंबाबाईचे दर्शन घेवूनच घरी जात होतो. आता तसे शक्य होत नाही. मोहिमेवर जातानाही देवाचे दर्शन घेतात अशी विचारणा केल्यानंतर आपण कोणत्याही मोहिमेवर नसल्याचे त्यांनी सांगितले.तो प्रशासनाचा प्रश्नपाटील म्हणाले, मी येथून पुण्याला निघालो आहे. तेथील कार्यक्रम आवरून शिर्डी, नाशिक करून २८ जूनला मुंबईला जाणार आहे. आई आणि सासू दोघी आजारी असल्याने घरी आलो होतो. सध्या जे शिवसेनेत चालले आहे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. बंडखोरांच्या कुटुंबियांचे संरक्षण काढून घेतल्याचे माहिती नाही. तो प्रशासनाचा प्रश्न आहे. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे उपस्थित होते.देवेंद्रना दिल्ली म्हणजे घर आणि अंगणासारखेफडणवीस सारखे दिल्लीला जात आहेत अशी विचारणा केल्यावर पाटील म्हणाले, देवेंद्र यांना दिल्ली म्हणजे घर आणि अंगणासारखे आहे. आमच्याच कामांसाठी तीन, चार जाण्यापेक्षा ते एकटेच जातात. त्यामुळे यामध्ये काही नवीन नाही. आमच्याकडे कोणाचाही कसलाही प्रस्ताव नाही.
देवेंद्र फडणवीसांना दिल्ली म्हणजे घर आणि अंगणासारखे - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 1:00 PM