इचलकरंजीतून पहिल्यांदाच काँग्रेसचे हात चिन्ह गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:33 PM2024-10-29T16:33:20+5:302024-10-29T16:34:27+5:30
अतुल आंबी इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसचा आहे. मात्र यावेळी ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला ...
अतुल आंबी
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसचा आहे. मात्र यावेळी ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला देण्यात आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर यंदा पहिल्यांदाच बॅलेट मशिनवरून काँग्रेसचे हात चिन्ह गायब झाले आहे. परिणामी प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर मुळातच घरघर लागलेल्या काँग्रेसला अस्तित्वासाठी अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून तसेच पूर्वीच्या इचलकरंजीसह असलेल्या हातकणंगले मतदारसंघातही स्वातंत्र्यापासून काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे ज्याला काँग्रेसची उमेदवारी मिळेल त्याचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात होते. त्या माध्यमातून काँग्रेसने या मतदारसंघात अनेकांना आमदार केले. सन २०१९ साली राजकीय उलथापालथी होऊन त्यावेळी जिल्हाध्यक्ष असलेले प्रकाश आवाडे यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन आपल्या गटासह सवतासुभा मांडत अपक्ष निवडणूक लढवली. त्यात त्यांना यशही आले. त्यावेळी विरोधी असलेल्या सुरेश हाळवणकर यांना रोखण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांनी आवाडे यांना पाठिंबा दिला होता.
अचानकपणे घडलेल्या या घडामोडीनंतरही काँग्रेसने राहुल खंजिरे यांना उमेदवारी देत बॅलेट मशिनवर काँग्रेसचे हात चिन्ह शाबूत ठेवले होते. शहरातील काँग्रेसला उभारी देण्यासाठी जिल्हा काँग्रेसकडूनही बळ मिळत होते. मात्र गत वर्षभरापासून हळूहळू स्थानिक काँग्रेसकडे जिल्हा आणि राज्य पातळीवरून दुर्लक्ष होत राहिले. याबाबत काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, शहराध्यक्ष संजय कांबळे व राहुल खंजिरे यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा केला.
मात्र जिल्ह्यातील वरिष्ठांनी अंतर्गत अन्य सलगीतून म्हणावे तसे लक्ष दिले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर पक्षामध्ये मरगळ आल्याचे दिसून आले. या सर्व घडामोडीकडे पाहताना निष्ठावंत काँग्रेसप्रेमी मात्र हवालदिल झाले आहेत. त्यांना बळ देण्यासाठी शहराध्यक्ष कांबळे यांनी विधानसभा लढवण्याची तयारी केली होती. मात्र महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरील वाटाघाटीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासाठी सोडण्यात आली. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा निवडणुकांमध्ये तरी काँग्रेसला बळ देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
इचलकरंजी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार
इचलकरंजी मतदारसंघ १९७८ साली स्थापन झाला. त्यावेळी आणि त्यानंतर १९८० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून कल्लाप्पाण्णा आवाडे लढले. त्यानंतर १९८५ पासून २०१४ पर्यंत सलग सात वेळा प्रकाश आवाडे हे काँग्रेसचे उमेदवार होते. गत निवडणुकीत मात्र पहिल्यांदाच राहुल खंजिरे हे काँग्रेसचे उमेदवार होते.