कोल्हापूर : लोकसभेसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत मंगळवारी (दि. ७ मे) होणाऱ्या मतदानाचे साहित्य घेऊन कर्मचारी पोलिस बंदोबस्तात मतदान केंद्रांवर रवाना झाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाराणी राधाबाई माध्यमिक उच्च माध्यमिक प्रशाला गडहिंग्लज येथील ईव्हीएम मशीन व साधनसामग्री वितरण केंद्राला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. साहित्य घेऊन कर्मचारी पोलिसांसह एसटी व केएमटी बसेसमधून आपापल्या केंद्रांवर मुक्कामासाठी गेले. मंगळवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होणार आहे.लाेकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली जिल्हा प्रशासनाची अंतिम तयारी सोमवारी सर्व केंद्रांवर नियुक्त केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांकडे सोपवल्यानंतर पूर्ण झाली. सोमवारी कोल्हापूर शहरातील उत्तर व दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघांतील साहित्याचे वाटप करण्यात आले. व्ही. टी. पाटील सभागृह येथे कोल्हापूर दक्षिणसाठी प्रांताधिकारी हरीष धार्मिक, तहसीलदार स्वप्नील रावडे तर विवेकानंद महाविद्यालयाच्या बापूजी साळुंखे सभागृह येथे महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर विधानसभा मतदारसंघातील साहित्य वितरित करण्यात आले.करवीरसाठी महासैनिक प्रशिक्षण केंद्र, कागलसाठी जवाहर नवोदय विद्यालय, राधानगरीसाठी मौनी विद्यापीठ गारगोटी तर चंदगड-गडहिंग्लजसाठी महाराणी राधाबाई माध्यमिक प्रशाला गडहिंग्लज येथे साहित्य वाटप करण्यात आले. हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडीसाठी शाहू हायस्कूल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, इचलकरंजीसाठी राजीव गांधी सांस्कृतिक भवन, शिरोळसाठी प्रशासकीय इमारत येथून साहित्य वाटप झाले.झोननिहाय प्रत्येक बूथसाठी स्वतंत्र टेबल मांडण्यात आले होते. येथील झोनलप्रमुख केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांना साहित्य देत होते. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट, नमुना मतपत्रिका, मतदार यादी, बोटावर लावण्याची शाई, स्टेशनरी, मतदान झाल्यानंतर मतपेट्या सील करण्याचे असे सर्वंकष साहित्य कर्मचाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आले. दक्षिणमधून ३२० तर उत्तरमधून ३११ केंद्रांचे साहित्य देण्यात आले. येथे कर्मचाऱ्यांनी सर्व साहित्य बरोबर आहे, व्यवस्थित आहे का, हे तपासले. त्यानंतर साहित्य घेऊन कर्मचारी केंद्रांवर रवाना झाले. सोमवारी त्यांना केंद्रांवरच मुक्काम करायचा असल्याने आपले कपडे, औषधे याची बॅग घेऊनच कर्मचारी साहित्य नेण्यासाठी आले होते.
पोस्टल मतदानाची सोयकेंद्रांवर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या पोस्टल मतदानाची सोयदेखील त्या-त्या विधानसभा मतदारसंघांत करण्यात आली होती. याशिवाय त्यांना आल्यानंतर चहा, नाष्टा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फॅन, कुलरची सुविधा होती. कर्मचाऱ्यांना त्रास झालाच तर खबरदारी म्हणून डॉक्टर, नर्सेस यांचे पथकही होते. काही जणांना उन्हामुळे उलटी, मळमळ, चक्कर असे त्रास जाणवले.