कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यापासून पहिल्यांदा हेल्मेट सक्तीची सुरुवात करावी. याचा विचार करून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अधिकारी व कर्मचारी मंगळवारपासून कार्यालयात हेल्मेट घालून येतील, अशी घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केली. जे परिवहन अधिकारी, कर्मचारी हेल्मेट घालून येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगरू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.३० व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते ताराबाई पार्कातील परिवहन कार्यालयात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठातील क्रीडा अधिविभागप्रमुख प्रा. पी. डी. गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होती. रविवार (दि. १०) पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.अजित शिंदे म्हणाले, बिहार, तमिळनाडूमध्ये हेल्मेटसक्ती आहे; पण महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत हेल्मेट सक्ती नाही. आपली सुरक्षा, आपल्या हाती आहे. आपल्याला सुधारायचे असेल, तर आपण स्वत: सुधारले पाहिजे, तरच समाज सुधारेल आणि आपणही सुखी व्हाल. १९८५ ला त्याकाळी अत्याधुनिक पद्धतीच्या दुचाकी, चारचाकी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वाहनांची संख्या वाढली; परंतु, रस्ते वाढले नाहीत. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक केले. तसेच जे अधिकारी, कर्मचारी हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर परिवहन व पोलीस विभागातर्फे कारवाई करू.अनिल गुजर म्हणाले, केवळ सात दिवस रस्ते सुरक्षा अभियानात वाहनांचे नियम पाळू नका. ते कायमस्वरूपी पाळावे, तरच रस्ते सुरक्षा अभियानाचा उद्देश सफल झाला, असे म्हणता येईल. यावेळी पी. डी. गायकवाड यांनी वाहतूक नियमांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्पीडवर नियंत्रण ठेवले पाहिजे, मनाचा वेग वाढवू नका. हेल्मेटसक्ती होणे गरजेचे आहे.
आपण नियम पाळूनसुद्धा चुका करूनये, असा सल्ला दिला. यानंतर मिशन डिफेन्स ड्रायव्हिंग स्टिकर्स वाहनांवर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले. यावेळी चारचाकी, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, महाविद्यालयीन युवक-युवती उपस्थित होते. वरिष्ठ मोटारवाहन निरीक्षक पी. डी. सावंत यांनी प्रास्ताविक केले. साहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी आभार मानले.