कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी असताना अत्यावश्यक कामाच्या नावाखाली रस्त्यावर आल्यास संबंधित व्यक्तीची आज, शनिवारपासून मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तशा सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या.
राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातही संचारबंदी लागू आहे. अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरिक बाहेर पडून गर्दी करीत आहेत. दुकान, बँक, भाजी मार्केट येथे नागरिकांची जास्त गर्दी होत आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी शहरात फिरती करताना सर्वत्र गर्दी असल्याचे दिसून आले. त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे होते.
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गैरफायदा घेतला जात आहे. संचारबंदी असूनही होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव व धोका अधिकच वाढला आहे. शहरात मोबाईल व्हॅनच्या पथकाद्वारे रॅपिड अँटिजेन (कोविड) चाचणी करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना बलकवडे यांनी उपआयुक्त निखिल मोरे यांना दिल्या. महापालिकेच्या या पथकाद्वारे शहरातील ज्या-ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या ठिकाणी जागेवरच आज, शनिवारपासून कोविड चाचणी करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तत्काळ विलगीकरण कक्षात पाठविण्यात येणार आहे.
दसरा चौकातील कॅनरा बँक येथे गर्दी असल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या दारामध्ये नागरिकांची गर्दी झाल्यामुळे प्रशासक बलकवडे यांनी आपली गाडी थांबवून बँक मॅनेजर यांना बोलावून घेतले. यावेळी या बँकेमध्ये नागरिकांमध्ये सोशल डिस्टंन्स नसल्याचे मॅनेजरांना निदर्शनास आणून दिले. तसेच बँकेमध्ये मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्स व सॅनिटायझरचा वापर होणे आवश्यक असल्याबाबतच्या सूचना दिल्या.
-गर्दी करणाऱ्यांना बसणार आळा? -
कोरोनाची साखळी तोडण्याकरिता राज्य सरकारने संचारबंदी केली असली तरी नागरिक अजूनही बेजबाबदारपणे वागत आहेत. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. परंतु, कोरोनाचे रुग्ण वाढल्यावर महापालिकेच्या यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे गर्दी रोखायची असेल तर असा काही निर्णय घेतला तर नागरिक रस्त्यावर येण्याचे टाळतील, अशी अपेक्षा आहे.