कोल्हापूर : नात्यातील मुलीला सोळाव्या वर्षी जबरदस्तीने पळवून नेऊन तिचा विवाह लावल्याचा प्रकार उघडकीस आला. वयाची १८ वर्षे पुर्ण होण्यापुर्वीच तिला सहा महिन्यांचा मुलगा झाला. पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याने पीडित मुलीने अखेर बाल कल्याण समितीकडे धाव घेऊन कैफियत मांडली. त्यानुसार पीडित मुलीचा पती, सासू आणि सासरे यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.पती नितीन बापू मोरे, सासरा बापू मोरे आणि सासू सीता बापू मोरे (तिघे रा. शिरोली पुलाची एमआयडीसी, ता. हातकणंगले) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी नितीन मोरे याने हातकणंगले तालुक्यातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण केले. त्यानंतर जबरदस्तीने तिच्याशी लग्न केले. वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच तिला मूल जन्माला घालण्यास भाग पाडले. तिला सहा महिन्यांचा मुलगा आहे. पतीसह सासू आणि सासरे यांच्याकडून सातत्याने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. दोन दिवसांपूर्वी पतीने तिला बेदम मारहाण केली. या त्रासाला कंटाळून माहेरला गेलेल्या पीडितेने तिच्या आईसह बाल कल्याण समितीकडे धाव घेतली.बाल कल्याण समितीने दिलेल्या पत्रानुसार अखेर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी पीडित मुलीच्या पतीसह सासू आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीचे अपहरण, बालविवाह आणि बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांकडून टोलवाटोलवीबाल कल्याण समितीच्या माजी अध्यक्षा प्रियदर्शिनी चोरगे आणि मंगल पवार यांनी पीडितेला शिरोली पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्यास सांगितले. मात्र, शिरोली पोलिसांनी पीडितेला करवीर पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. करवीर पोलिसांनीही तिची दाद घेतली नाही. अखेर बाल कल्याण समितीने पत्र दिल्यामुळे शिरोली पोलिसांनी फिर्याद घेऊन संशयितांवर गुन्हा दाखल केला.
Kolhapur News: शिरोलीत अल्पवयीन मुलीचा जबरदस्ती विवाह अन् मारहाण; पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 1:18 PM