चंदगड : तुमचं आमचं नातं मित्रत्वाचे असताना आम्हाला अशी वागणूक का देता? असा सवाल करत आरटीपीसीर तपासणी प्रमाणपत्राची सक्ती रद्द करावी, या मागणीसाठी चंदगड तालुक्यातील नागरिकांनी महाराष्ट्र- कर्नाटक हद्दीवर गुरुवारी शिनोळी येथे बेळेभाट-वेंगुर्ला मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
कर्नाटक शासनाने गेल्या काही दिवसांपासून बाची, अतिवाड, राकसकोप येथे कडक पोलीस बंदोबस्तासह आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र असलेल्या लोकांनाच बेळगावात (कर्नाटक) प्रवेश दिला जात होता. त्यामुळे चंदगड तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वैद्यकीयबाबतीत, नोकरी, व्यवसाय तसेच शेतीमाल खरेदीसाठी चंदगडमधील लोकांचा बेळगावशी नेहमीच संपर्क असतो; पण आरटीपीसीआरच्या सक्तीने तो संपर्कच तुटला होता. त्यामुळे तो संपर्क सुरळीत व्हावा यासाठी शिनोळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने चंदगड तहसीलदारांना निवेदन दिले होते; पण यामध्ये बदल न झाल्याने संतप्त नागरिकांनी शिनोळी येथे बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे बराचवेळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी बेळगावचे तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना आरटीपीसीआरची सक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शिनोळी बुद्रुकचे सरपंच सोपान पाटील, उपसरपंच बंडू गुडेकर, भैरू खांडेकर, प्रताप सूर्यवंशी, केतन खांडेकर, डॉ. एन. टी. मुरकुटे, अजित खांडेकर, प्रीतम पाटील, आदी उपस्थित होते.
चौकट : वैद्यकीयबाबतीत चंदगड तालुका पूर्णपणे बेळगाववर अवलंबून आहे. त्यामुळे आरटीपीसीआरच्या सक्तीच्या निर्णयामुळे रुग्णांची जास्त हेळसांड होत आहे. त्यामुळे बेळगाव-चंदगड नाते पूर्वीप्रमाणेच राहावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
फोटो : १२ चंदगड आंदोलन
आरटीपीसीर सक्ती रद्द करावी, यासाठी बेळगावच्या तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना शिनोळीचे सरपंच सोपान पाटील यांनी गुरुवारी निवेदन दिले.