कोल्हापूर : अंबाबाई मंदीर परिसरातील नारळीकर भवन पहिला मजला येथील गाळ्यामध्ये सुरु केलेल्या हॉटेलचे ३२ हजार रुपये भाडे देवूनही जबरदस्तीने हॉटेलचा ताबा घेतल्याप्रकरणी गाळा मालकावर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला. संशयित रामचंद्र गजानन धुरी (रा. रत्नदिप हौसिंग सोसायटी, गांधीनगर, बांद्रा) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, रामचंद्र धुरी यांचा अंबाबाई मंदीर परिसरात गाळा आहे. तो पद्मनाथ धोंडीराम पिसे (रा. डोंबीवली) यांनी हॉटेलसाठी भाड्याने घेतला होता. त्यासाठी कराराप्रमाणे त्यांना महिन्याला ३२ हजार रुपये भाडे दिले होते. या ठिकाणी विजयकुमार शंकर शेटे (रा. चिले कॉलणी, कोल्हापूर) हे काम पाहतात.
संशयित धुरी यांनी शेटे यांना तुमचे मालक पिसे यांना जागा भाड्याने द्यायची नाही असे म्हणून हॉटेलच्या शटरचे कुलूप तोडून स्वत:कडील लावले. तसेच शेटे यांना गाळ्यामध्ये येण्यास मज्जाव केला. हॉटेलच्या बाहेर लावलेले चार बोर्डही धुरी यांनी चोरुन नेले. याप्रकरणी शेटे यांनी फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे तपास करीत आहेत.