गडहिंग्लज :
आजरा तालुक्यातील पेरणोली-देवकांडगाव रोडवर देवकांडगावच्या हद्दीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीवर छापा टाकून दोन वाहनांसह ४ लाखाची दारू जप्त केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी (दि. २२) ही कारवाई केली.
याप्रकरणी निव्हेल बाबतेस बारदेस्कर (वय ३५, मूळ गाव, मुरगूड, ता. कागल) व मिल्टन जॉकी डिसोझा (२६, मूळ गाव भडगाव बुद्रूक, ता. कुडाळ, दोघेही सध्या रा. वाकीघोल मळा, ता. राधानगरी) आणि विठ्ठल गोविंद पाटील (३५, रा. कडगाव, ता. गारगोटी) या तिघांविरूद्ध गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले आहे.
पेरणोली ते देवकांडगाव रोडवर मारूती सुझुकी (क्र. एमएच ०७ क्यू ३३०९) व हिरोहोंडा (क्र. एमएच ०९ बीक्यू ९७७४) या वाहनांची राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने तपासणी केली. संबंधित वाहनांमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा अवैध साठा आढळून आला.
या कारवाईत वाहनांसह ५०० मि.लि.च्या १४४ सीलबंद बिअरच्या बाटल्या, काजू फेणीच्या १८० मि.लि.च्या ४८ बाटल्या, व्हिस्की व रमच्या १८० मि.लि.च्या १४४ बाटल्या व ७५० मि.लि.च्या १६८ बाटल्या असलेले २४ बॉक्स मिळून ३ लाख ९६ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गडहिंग्लज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम. एस. गरूड, दुय्यम निरीक्षक जी. एन. गुरव, सहायक दुय्यम निरीक्षक एस. आर. ठोंबरे, ए. टी. थोरात, ए. आर. जाधव यांनी ही कारवाई केली.
-------------------------
फोटो ओळी :
पेरणोली-देवकांडगाव (ता. आजरा) नजीक राज्य उत्पादन शुल्कने कारवाई करून जप्त केलेला गोवा बनावटीचा मद्यसाठा.
क्रमांक : २२१२२०२०-गड-०६