कोल्हापूर : कोल्हापूर इज ग्रेट, ब्युटिफुल असे कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे भरभरून कौतुक करत, परदेशातील पर्यटकांनी कोल्हापूरच्या प्रेमळ संस्कृतीचा अनुभव बुधवारी घेतला. न्यू पॅलेस, अंबाबाई मंदिर, जुना राजवाडा, शिवकालीन युद्धकलेची प्रात्याक्षिके पाहून भारावून गेले. ‘पॅलेस ऑन व्हील’ या राजस्थानातील शाही रेल्वेच्या धर्तीवर महाराष्ट्रात धावणाऱ्या डेक्कन ओडिसी या शाही रेल्वेतून १९ पर्यटक कोल्हापुरात आले.पर्यटकांचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवर रेल्वे प्रशासनाने स्वागत केले. रुबाबदार कोल्हापुरी फेटा बांधून पर्यटकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर, वातानुकूलित ट्रॅव्हलमधून कोल्हापूर दर्शन घडविण्यात आले. न्यू पॅलेस येथे नेण्यात आले. हा पॅलेस पाहून पर्यटक भारावून गेले. तेथे पॅलेससोबत अनेक क्षण त्यांनी कॅमेऱ्यात कैद केले. एका पर्यटकांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली. छत्रपती शहाजी वस्तुसंग्रहालयातील वस्तूंनी पर्यटकांना आकर्षित केले. प्राणिसंग्रहालय पाहून त्यांनी पॅलेस व्यवस्थापनाचे कौतुक केले.
टाउन हॉल वस्तुसंग्रहालयातील दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाच्या पाऊलखुणांची माहिती पर्यटकांनी घेतली. कोल्हापूरचे वैशिष्ट्य असलेल्या कोल्हापुरी चपलांची खरेदी पर्यटकांनी चप्पल लाइन परिसरात केली. तेथून श्री अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले. तेथील स्थापत्य कलेचा नमुना पाहून परदेशी पर्यटक थक्क झाले. जुना राजवाडा येथील भवानी मंडप येथे शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली. शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाच्या मावळ्यांनी आणि रणरागिणींनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून पर्यटकांची मने जिंकली. त्यानंतर, पर्यटकांनी कोल्हापुरीच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेत, पुढील प्रवासासाठी रवाना झाले.