कोरोनाच्या पहिल्या लाटेत इचलकरंजी शहरात जवळपास तीन महिन्यांचे कडक लॉकडाऊन लागू केले होते. साधारणत: २००० कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रशासनाने अचानक केलेल्या निर्बंधांमुळे परप्रांतीय कामगारांचे मोठे हाल झाले. अनलॉकबाबत कोणतीच शाश्वती नसल्यामुळे अनेकांनी मिळेल त्या मार्गाने आपले गाव गाठले होते. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांतील साडेनऊ हजार कामगार मूळ गावी गेले होते. लॉकडाऊनमुळे शहरातील सुमारे ५० हजार कामगारांच्या रोजी-रोटीचा प्रश्नही गंभीर बनला होता.
पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाने सध्या कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणणे जिकिरीचे बनले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता भविष्यात पुन्हा कडक संचारबंदी लागण्याची शक्यता आहे. सध्या प्रशासनाने जाहीर केलेली संचारबंदी अजून किती काळ सुरू राहणार आहे, याची शाश्वती आज कोणीही देऊ शकत नाही. अशा अस्थिर परिस्थितीमुळे कामगारांनी पुन्हा एकदा मूळ गावी जाणे पसंद केले आहे.
चौकट
दुष्काळात तेरावा महिना
यंत्रमाग व्यवसाय अनेक वर्षांपासून मंदीच्या संकटात सापडला आहे. अनियमित सुताचे भाव, कापडाचे कमी होत जाणारे दर यासह अन्य अडचणींतून यंत्रमाग व्यवसाय सध्या मार्गक्रमण करत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता कुठे परिस्थिती सुधारत असताना परप्रांतीय कामगार पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी जात आहेत. त्यामुळे यंत्रमाग उद्योजकांना दुष्काळात तेरावा महिना, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
प्रतिक्रिया
लॉकडाऊन असल्यामुळे यंत्रमाग व्यवसाय बंद होत आहेत. इतरही उद्योग बंद होत असल्यामुळे कोणतेही काम मिळत नाही. आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून, जगणे मुश्कील झाले आहे. रोजीरोटीचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे गावी जात आहोत. हरेन्द्र कुमार-बिहार, यंत्रमाग कामगार
फोटो ओळी
२२०४२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीतील परप्रांतीय कामगार आपल्या मूळगावी निघाले आहेत.
छाया-उत्तम पाटील