एकनाथ पाटील-- कोल्हापूर खून, बलात्कार, तसेच हस्ताक्षराचा अहवाल पुणे, मुंबईतील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी सहा ते सात महिन्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. नांदेडपाठोपाठ आता कोल्हापुरातही ‘फॉरेन्सिक लॅब’ (प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा) स्थापन करण्यासाठी गृहविभागाने मंजुरी दिली आहे. ‘फॉरेन्सिक लॅब’साठी जिल्हा पोलीस प्रशासनाने पन्हाळा रोडवरील एक जागा व गोळीबार मैदान (कसबा बावडा) ही दोन ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यांची पाहणी करून एका जागेची निश्चिती करण्यासाठी राज्याच्या विधी आणि तांत्रिक विभागाच्या पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर आज, शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी रंगीत तालीम म्हणून शुक्रवारी या दोन्ही जागांची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. विषप्राशन, दारू, खून किंवा संशयास्पद व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ‘सीपीआर’च्या शवागृहात डॉक्टरांकडून ‘व्हिसेरा’ राखून ठेवला जातो. शवविच्छेदनावेळी शरीरातील किडनी, जठर, रक्त, मेंदू, आदी काढलेले भाग पुणे येथील औंध प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. तेथील अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होते. त्याचबरोबर हस्ताक्षराची तपासणी, सडलेला मृतदेह (ओळखता न येणारा), बलात्कारपीडित तरुणी, महिला व आरोपींच्या रक्ताचे नमुने (डीएनए) यांची चाचणी याच प्रयोगशाळेतून केली जाते. येथून दहा ते बारा जिल्ह्यांतून आलेल्या व्हिसेऱ्याची चाचणी केली जाते. त्यामुळे व्हिसेऱ्याचा अहवाल मिळण्यासाठी सहा-सात महिने किंवा वर्षही उलटते. हे अहवाल वेळेत न मिळाल्याने येथील प्रशासनाच्या व पोलिसांच्या कामकाजावरही परिणाम होत आहे. यामुळे ‘फॉरेन्सिक लॅब’ कोल्हापुरात सुरू करावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे अनेक वर्षांपूर्वी सादर केला होता. त्यामुळे नांदेडपाठोपाठ आता या प्रस्तावालाही शासनाने मंजुरी दिली आहे.
‘फॉरेन्सिक लॅब’ आता कोल्हापुरात
By admin | Published: March 04, 2016 11:15 PM