संदीप आडनाईककोल्हापूर : वनविभागाने २०१९ चा ‘इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट’ नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कोल्हापुरातील वनआच्छादन हे सुमारे साडेनऊ टक्क्यांनी घटल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. ही घट अतिशय गंभीर असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी दिली आहेत.कोल्हापूर हे पश्चिम घाटातील महत्त्वाचे जंगलक्षेत्र असून या परिसरातील जंगलाचे क्षेत्र कमी होणे, ही पर्यावरणाची मोठी हानी आहे, असे ते म्हणाले. ‘इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २०१९’ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलक्षेत्र हे ९.६८ टक्क्यांनी कमी झाल्याचे आकडेवारी दर्शविते.वृक्षतोड, मानवी हस्तक्षेप, जमिनींचे संपादन, प्राण्यांचा नेहमीचा कॉरिडॉर बंद होणे, जंगलांना लागणारा वणवा आणि मनुष्य-वन्यप्राणी संघर्षाचाही परिणाम जंगलक्षेत्र कमी होण्यामागे असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याचाच अर्थ ३३ कोटी वृक्षारोपणाचा कोणताही दृश्य परिणाम झालेला नाही, असा काढता येतो.सन २०१७ ते २०१९ या दोन वर्र्षांतील पाहणीचा हा अहवाल आहे. यामध्ये अतिशय घनदाट, मध्यम आणि खुले वनक्षेत्र अशा तीन प्रकारच्या वर्गवारीच्या नोंदी निरीक्षणासाठी घेतल्या आहेत. २०१७ च्या तुलनेत कोल्हापुरातील वनक्षेत्र हे २0१९ च्या डिसेंबरअखेर ९.६८ चौरस किलोमीटर इतके कमी झाल्याचे या अहवालात नोंदविले आहे.जंगल आणि गावातील जागेवर अतिक्रमण होत चालले आहे. माणसांच्या अतिक्रमणापेक्षा बॉक्साईटच्या खाणींचेही अतिक्रमण आहे. गेल्या १० वर्र्षांत या खाणी हळूहळू वाढत चालल्या आहेत. गायरान, पाण्याचे स्रोेत यामुळे नष्ट झाले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी आणि दाजीपूर ही दोन मोठी अभयारण्ये आहेत. १९८0 पर्यंत ही दोन्ही अभयारण्ये एकच होती. दोन्ही अभयारण्यांचे क्षेत्रफळ ३५१.१६ चौरस किलोमीटर आहे. संरक्षित असूनही गेल्या १० वर्र्षांत या क्षेत्रात प्रचंड जंगलतोड झाली. त्यामुळे त्याचा वातावरणावरही परिणाम झाला आहे. राधानगरी अभयारण्याची ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून नोंद आहे. १९५८ मध्ये दाजीपूर हे गव्यांसाठी राखीव अभयारण्य जाहीर झाले; तर १९८५ मध्ये राधानगरीला अभयारण्याचा दर्जा दिला गेला.पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने घनदाट जंगल असणे महत्त्वाचे आहे. मात्र सर्वत्रच हे जंगल कमी होत चालले आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. खुरट्या जंगलाची आकडेवारी पाहिल्यास हे सिद्ध होते. खुरटे जंगल हे १०२.८३ चौरस किलोमीटर इतके वाढले आहे.
राखीव जंगलांतही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते आहे. इतकेच नव्हे तर राधानगरीसारख्या संरक्षित जंगलालाही वणवा लागतो हे गंभीर आहे. बरेचसे जंगल हे खासगी आहे आणि त्यावर वनखात्याचे नियंत्रण नाही. यासाठी खासगी जंगलही ताब्यात घेण्याचे धाडस सरकारने दाखविले पाहिजे. राखीव जंगलात मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप आहे, तो रोखला पाहिजे.चोरटी जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा या तीन जिल्ह्यांतील वनक्षेत्र हे संरक्षित केले पाहिजे, अन्यथा जंगल नावालाच उरेल. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो; परंतु तेथील सर्वाधिक जंगलक्षेत्र हे खासगी आहे. त्यावर सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे मोठी जंगलतोड वनखात्याच्याच परवानगीने चालते, असा आरोप पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी केला आहे.जंगलाची स्थिती (आकडे स्क्वेअर किलोमीटरमध्ये)
- भौगोलिक क्षेत्र : ७६८५
- एकूण जंगल : १७८६.३२
- घनदाट जंगल : ६४.००
- मध्यम जंगल : १०२०.४४
- खुले जंगल : ७०१.८८
- एकूण घट : ०९.६८
- भौगोलिक क्षेत्राच्या तलनेत टक्केवारी : २३.२४
- खुरटे जंगल : १०२.८३
जंगलक्षेत्र कमी होण्याला मानवी हस्तक्षेपच प्रामुख्याने कारणीभूत आहे. राधानगरीसारख््या अभयारण्याला संरक्षित वनाबाबतची अंतिम अधिसूचना अद्यापही निघालेली नाही, यावरूनच सरकार जैवविविधतेच्या बाबतीत किती गंभीर आहे, हे लक्षात येते. पश्चिम घाटाचा समावेश असलेल्या कोल्हापुरातील पश्चिम भागातील आठ तालुक्यांतील जंगल असेच हळूहळू नष्ट होईल, अशी भीती आहे.- डॉ. मधुकर बाचूळकर,पर्यावरण तज्ज्ञ.