अमर पाटील
कळंबा : रंकाळा, कळंबा तलावाभोवती कधीकाळी मुबलक प्रमाणात असणाऱ्या वनसंपदेला प्रशासन विकासकांनी कसेही ओरबाडल्याने कळंबा, रंकाळा तलावाभोवती असणारी वनसंपदा मोठ्या प्रमाणावर घटत आहे.
गेल्या काही दशकात जळाऊ लाकडांसाठी नागरी वस्त्या निर्माण करण्यासाठी विकासाचे कारण पुढे करत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली. परिणामी येथील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी आजमितीला प्रचंड तापमान वाढीने उपनगरांचा उन्हाळा असह्य होत आहे.
रंकाळा, कळंबा तलाव परिसरातील नैसर्गिक ठेवा जतन करण्याबाबतचे अज्ञान, वनीकरणाचे तोकडे प्रयत्न, तसेच निसर्गप्रेमींची अनास्था दिसून येते. १ जुलैला प्रसिद्धीपुरते वृक्षारोपण करण्यात पालिका प्रशासनासह काही सामाजिक संस्था हिरीरीने सहभागी होतात. पुढे लावलेल्या झाडांचे काय होते हे कुणालाच माहीत नसते. पर्यावरण कायदा, जैवविविधता कायदा याची पालिकेत अंमलबजावणी होत नाही. जैवविविधता कायद्यान्वये पालिकेत नागरिकांची जैवविविधता समिती अस्तित्वात आहे का, याचे उत्तर प्रशासनासच ठावूक.
प्रतिक्रिया...
रंकाळा तलावाभोवती चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वृक्षलागवड व संवर्धनाबाबतीत निव्वळ प्रशासनावर अवलंबून न राहता, स्वतः नागरिकांनी पुढाकार घ्यावा. निसर्ग व पर्यावरणप्रेमींनी याबाबत जागरूकता दाखवावी.
- नगरसेवक शारंगधर देशमुख
उपनगरांच्या विकासासाठी रस्ते विकासासाठी विविध योजनांसाठी बेसुमार वृक्षांची तोड झाली, परंतु नव्याने वनसंपदा निर्माण करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. परिणामी उपनगरे बकाल होत आहेत. जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत आहे. परिसरातील विहिरी, बोअरवेलचे जलस्त्रोत कमी होत आहेत. प्रशासनाकडूनसुद्धा घनदाट सावली देणाऱ्या, पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या वृक्षांऐवजी शोभेच्या वृक्षांचे रोपण सुरू आहे. वृक्षतोडीने जैवविविधतेचे नुकसान झाल्याने पक्ष्यांचे स्थलांतर सुरू आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात उपनगरे तुंबून नागरी वस्तीत पाणी शिरत आहे. या गंभीर प्रश्नी आताच विचार व कृती नाही केली, तर भविष्यात मोठा धोका अटळ असल्याचे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.
चौकट
जैवविविधता समिती कुठे आहे
राज्य शासनाने पालिकेत जैवविविधता समिती नेमण्याचे आदेश दिले. पालिका क्षेत्रातील जलचर, जलसंपत्ती, वनसंपदा, नदी, नाले या माहितीचे तपशीलवार वर्गीकरण करत संवर्धन करणे हे समितीचे काम. पण तिचे अस्तित्व शून्य.
प्रतिक्रिया... - श्रध्दानंद रणदिवे, निसर्गप्रेमी
वृक्षांच्या कत्तलीने उपनगरांचे नुकसान होत आहे. तापमानवाढ, प्रदूषण, पाणीटंचाई आदी समस्या वाढत आहेत. विकासाच्या नावाखाली असेच सुरू राहिले, तर ऱ्हास अटळ आहे .त्यामुळे वृक्षलागवड व संवर्धन उपक्रमात नागरिकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सहभागी व्हावे
फोटो ओळ
कधीकाळी वृक्षांचे नंदनवन असणारा परिसर आज बकाल बनत आहे.