आजरा तालुका हा जंगलाने व्यापलेला असा निसर्गसंपन्न भाग आहे. जंगल हे या ठिकाणचे वैभव आहे. त्यांचे जतन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. शासनाकडून यासाठी प्रत्येकवर्षी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन यासाठी प्रत्येक गावातील संयुक्त वनसंरक्षण कमिटीच्या खात्यावर निधी पाठवला जातो. परंतु या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शासनाचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाही. वनकमिट्या कागदावरच असून, त्यांचा सर्व कारभार त्या कमिटीचे सचिव वनपाल परस्पर करताना निदर्शनास येत आहेत. सदरच्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती गठण करण्याची प्रक्रिया ही कायद्यातील मुद्द्याला सुसंगत नसल्याचे दिसत आहे. तरी तालुक्यातील सर्व संबंधित कमिट्यांची रचना व मागील आर्थिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षात झालेल्या खर्चाची तपासणी करून घेऊन संबंधित ग्रामपंचायतीकडे तपशिलाने कळवावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर सरपंच परिषद मुंबई शाखा अध्यक्ष संतोष बेलवाडे, उपाध्यक्ष यु. व्ही. जाधव, राज्य संघटक राजू पोतनीस, संभाजी सरदेसाई, सचिव अमोल बाबरे, जी. एम. पाटील, सुनील देसाई, लक्ष्मण गुडूळकर, लहू पाटील, मनीषा देसाई, वैशाली गुरव, मारुती मोरे यांच्यासह तालुक्यातील सरपंचांच्या सह्या आहेत.
फोटो ओळी : वनसंवर्धन कमिटी यांची रचना कायद्यानुसार करा, या मागणीचे निवेदन वनक्षेत्रपाल स्मिता डाके यांना देताना संतोष बेलवाडे, अमोल बांबरे, मनीष देसाई, वैशाली गुरव, जी. एम. पाटील, सुनील देसाई.
क्रमांक : ०३०९२०२१-गड-०३