कोल्हापूर : येथील रुईकर कॉलनीतील भरवस्तीमध्ये जेरबंद केलेला व नंतर मृत्यू झालेला बिबट्या पाळीव असल्याचा संशय उशिरा का होईना, वन विभागालाही आला आहे; त्यामुळे बिबट्या कुठून आला, हे शोधूनही सापडत नसल्यामुळे वन विभागानेही विविध शक्यता पडताळून पाहण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसापासूनच, शहरात तो बिबट्या पाळीव नसता, तर गर्दीतील एखाद्याला तरी त्याने संपविले असते; तो पाळीवच असावा, अशी चर्चा सुरू आहे. सुरुवातीला वन विभागाची यंत्रणा या चर्चेकडे दुर्लक्ष करीत होती. मात्र, आता पोलिसांच्या मदतीने, तो कोणी पाळला होता का, या दिशेने तपास चालू केला आहे. या बिबट्याच्या अंगावर गोचिड होती, असे वनविभागाच्या चौकशीत निदर्शनास आले आहे. शक्यतो घरी पाळलेल्या प्राण्याच्या शरीरावरच गोचिड अथवा तत्सम किटक आढळून येतात. हा बिबट्या जंगली होता तर मग त्याच्या अंगावर गोचिड कसे आले अशी शंका वनविभागालाही आली आहे. या शंकेमुळेच तो पाळीव असल्याची शंका बळावली आहे. बिबट्याला गुरुवारी (दि. १) गजबजलेल्या रुईकर कॉलनीतून जेरबंद केले. कुचीकोरवी समाजातील युवकांनी त्याला जाळी लावून पकडताना त्याचा खूप छळ झाला. त्याला चांदोली अभयारण्यात सोडावयास जाताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. उपाशी आणि हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले. तो सर्वसाधारणत: चार दिवस उपाशी होता. त्याच्या शरीरात पाण्याचेही प्रमाण कमी होते असे अहवालात म्हटले आहे. मात्र, उपाशी वन्य प्राणी भक्ष्यावर हल्ला करतो. वन्य प्राण्याचे हे वैशिष्ट्य आहे. पकडण्यापूर्वी तो सैरभैर धावत होता. त्यावेळी अनेकजण त्याच्या जवळ जात होते. तेव्हा त्याने आक्रमकपणे हल्ला का केला नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. कुणीतरी तो छंद म्हणून पाळला आणि त्याची माहिती बाहेर पडली. प्रकरण अंगलट येणार असे वाटल्यामुळे उपाशी ठेवून बिबट्याला त्याचदिवशी बाहेर सोडले होते का अशी शक्यता विचारात घेवून वन विभाग चौकशी करत आहे. बागेची पाहणी वन विभागाच्या पथकाने रुईकर कॉलनीत जाऊन शनिवारी सकाळी पाहणी केली. बिबट्या जेरबंद केला त्यापासून महानगरपालिकेची बाग किती अंतरावर आहे. त्याला लपविण्याच्या दृष्टीने अनुकूल भौगोलिक परिस्थिती होती का, याचाही पंचनामा केला.
बिबट्या पाळीव असल्याचा वन विभागालाही संशय
By admin | Published: January 04, 2015 1:10 AM