कोल्हापूर : इचलकरंजी येथील बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीशी कनेक्शन असणाºया गडहिंग्लज येथील व्यापाºयाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. १५) ताब्यात घेतले. संशयित राहुल मारुती नेसरी (वय ३०, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे.
नेसरी याच्या ताब्यातून ९७ हजार ८०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. नेसरी याचे गडहिंग्लज बाजारपेठेत कपड्यांचे दुकान आहे. बनावट नोटांचा त्याने व्यवहारामध्ये वापर केल्याची कबुली दिल्याने त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.
इचलकरंजी, दातार मळा येथील एका कारखान्यात बनावट नोटा तयार करणाºया तिघाजणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी १७ आॅक्टोबरला अटक केली होती. मुख्य संशयित जीवन धोंडिबा वरुटे (२४, रा. दातार मळा, लिंबू चौक, इचलकरंजी), त्याचे दोन साथीदार सागर शिवानंद कडलगे (२१, रा. संभाजी चौक, लंगोटे मळा, इचलकरंजी), रोहित राजू कांबळे (१९, रा. दुसरी गल्ली, दातार मळा, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दहा लाख एक हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तीन महिन्यांपासून नोटा तयार करून दैनंदिन व्यवहारात खपविल्या जात होत्या, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
संशयित वरुटे याने दीड महिन्यापूर्वी व्यापारी मित्र नेसरी याच्याकडे बनावट नोटा खपविण्यासाठी दिल्या होत्या. याबाबत पथकाने गडहिंग्लज येथे छापा टाकला असता संशयित नेसरी याच्या भडगाव येथील घरी बनावट नोटा मिळून आल्या. नोटांमध्ये दोन हजारांच्या ३३, पाचशे रुपयांच्या ६२, दोनशेच्या ४ अशा ९७ हजार ८०० रुपयांच्या बवावट नोटा जप्त केल्या. नेसरी याने बनावट नोटा दैनंदिन व्यवहारात खपविल्याची कबुली दिली आहे.