कोल्हापूर : रस्त्यातील खड्डे आणि त्यातून पाठीच्या मणक्यांच्या आजाराने बेजार झालेले दुचाकीस्वार असे चित्र सर्वत्र पाहण्यास मिळते. यातून सुटका करण्यासाठी कोल्हापुरातील फुलेवाडी येथील दीपक कुबडे या युवकाने दुचाकीचा प्रवास आरामदायी व्हावा. या दृष्टीने इलेक्ट्रिकल सस्पेंशन शॉक अॅब्सॉर्बर बनविले आहेत; त्यामुळे खड्डे असलेल्या मार्गावरून जरी प्रवास केला, तरी दुचाकीस्वारास आरामदायी हादरेविरहित दुचाकी चालविण्याचा आनंद लुटता येणार आहे. या संशोधनाचे पेटंटची नोंदणीप्रक्रिया कुबडे यांनी केली आहे.प्रत्येकाच्या जीवनात वेळेला अधिक महत्त्व निर्माण झाले आहे; त्यामुळे दैनंदिन वापरात दुचाकीचा वापर वाढला आहे; पण शहरातील रस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातून दुचाकी गेल्यानंतर मणक्यांना मोठा हादरा बसून इजा होते.
कुबडे हेही मार्केटिंगचे काम करीत असल्याने रोज २०० किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास दुचाकीवरून करतात; त्यामुळे दुचाकी चालविताना त्यांना अनेकदा पाठीच्या दुखण्याला सामोरे जावे लागते. ही बाब ध्यानी घेऊन त्यांनी तीन वर्षांच्या विचाराअंती दुचाकीच्या शॉक अॅब्सॉर्बरला पूरक ठरणारे इलेक्ट्रिक मोटारवर एक यंत्रणा तयार केली.
दुचाकीवरून एक किंवा दोन व्यक्ती प्रवास करणार असतील त्याप्रमाणे ते एका बटणाद्वारे शॉक अॅब्सॉर्बरमध्ये आरामदायीपणा आणता येतो; त्यामुळे त्यांना प्रवास करताना त्रास होतो. हे कमी करण्यासाठी त्यांनी शॉक अॅब्सॉर्र्बला एक नवीन यंत्र बसविले. त्यात स्पीडोमीटर जवळ त्याचे बटण बसविले आहे.
एक दुचाकीस्वार त्या बटणानुसार शॉक अॅब्सर्स आॅपरेट करू शकतो; त्यामुळे एक व्यक्ती बसो अथवा दोन त्यांना कोणताही हादरा बसत नाही. दुचाकी उत्पादन करणाऱ्या कंपनीने हे तंत्रज्ञान वापरल्यास येणाऱ्या काळात दुचाकीस्वारांना पाठदुखी व कंबरदुखीपासून मुक्तता मिळू शकते. हा बदल केवळ नव्या उत्पादित होणाऱ्या दुचाकीत उत्पादन करताना दुचाकीच्या चेसीसमध्ये बदल करताना सोपा जातो; त्यामुळे या तंत्रज्ञानाचा फायदा नव्या दुचाकीला अधिक आहे.
तीन वर्षांच्या संशोधनानंतर आरामदायी इलेक्ट्रिक सस्पेन्शन व मॅकेनिकल अशा दोन्ही तंत्राचा वापर करून ही यंत्रणा बनविली आहे. त्याचे पेटंट नोंदणी प्रक्रियेत आहे. जुन्या दुचाकीपेक्षा दुचाकी उत्पादक कंपन्यांना नव्याने उत्पादित होणाऱ्या दुचाकीत हवे ते बदल करून बसविणे शक्य आहे.- दीपक कुबडे