कोल्हापूर : कोणत्याही गटबाजीला थारा देणार नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून शिवसेनेत एकच उद्धव ठाकरे गट राहील. त्यानुसार कामाला लागा, असे इशारा वजा आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे शिवसैनिकांना केले. आमचं पण, ठरलंय, जे काही ठरलंय ते वेळ येईल, तसे जाहीर केले जाईल. आमच्या एकीची वज्रमूठ कोणी भेदू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.येथील शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मंत्री सामंत यांची शिवसेनेने कोल्हापूरच्या संपर्क मंत्रिपदी निवड केली आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील शिवसैनिकांच्यावतीने जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात पक्षाच्या विस्तारासाठी एकीची वज्रमूठ करावी. संघटनात्मक बांधणी करणे, विकासात्मक कामे जनतेपर्यंत पोहोचविणे, आदींबाबत विचारविनिमय करण्यासाठी सेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. राज्यात ठरल्यानुसार कोल्हापुरात शिवसेनेला न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी येत्या दहा दिवसांमध्ये पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
या मेळाव्यास माजी आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सुरेश साळोखे, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, महिला आघाडीच्या शुभांगी पवार, मंगल चव्हाण, स्मिता माने, हर्षल सुर्वे, मंजित माने, आदी उपस्थित होते. शिवाजीराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले.कोण काय म्हणाले
- खासदार माने : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे नियोजन करून त्यामध्ये शिवसैनिकांना संधी द्या.
- आमदार आबिटकर : कोल्हापूर शिवसेनामय करण्यासाठी शिवसैनिक आपल्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहील.
- जिल्हाप्रमुख पवार : शासकीय समित्या, निवडणुकांमध्ये शिवसैनिकांना संधी मिळावी. पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न व्हावेत.
- मंत्री सामंत म्हणाले : जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये काही मतभेद असतील, तर एकत्र बसून मिटविले जातील
- जुने शिवसैनिक, महिला-भगिनी कार्यकर्त्या, युवा सैनिकांना न्याय देणार
- सांघिकपणे, प्रत्येकाच्या विचाराने काम करणार
- शाखाप्रमुखांची यादी प्रामाणिकपणे द्यावी.