चंदगड : गेली दोन वर्षे कोरोनामुळे शेतकरी व व्यापारी अडचणीत आहेत, त्यामुळे त्यांची या काळातील घरपट्टी माफ करावी, असा ठराव पंचायत समिती सदस्य जगन्नाथ हुलजी यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडला. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती अॅड. अनंत कांबळे होते.
कोरानामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती हालाखीची बनली आहे. त्यामुळे त्यांची घरपट्टी माफ व्हावी, असा ठराव पंचायत समिती सदस्य हुलजी यांनी मांडला असता, हा अधिकार आपल्याला नसून हा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवू, असे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी सांगितले. तालुका दुर्गम असून, कोरोना लस पुरवठ्याचे प्रमाण खूपच कमी आहे. ते वाढविण्याची मागणी सर्वच सदस्यांनी उचलून धरली.
कोरोना कालावधीमध्ये अंगणवाडी सेविकांना ग्रामपंचायतीने मानधन द्यावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य मनिषा शिवणगेकर यांनी केली. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तत्काळ भरा, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा सदस्य दयानंद काणेकर यांनी दिला.
तत्पूर्वी राजर्षी शाहू पुरस्कारप्राप्त गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार, तानाजी सावंत, आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका सुनीता प्रभू, अंगणवाडी सेविका विद्या माडूळकर, मदतनीस प्रेमा सडाके, शैला धुपदाळे, सुवर्णा कुंभार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत, पंचायत समिती सदस्य विठाबाई मुरकुटे, नंदिनी पाटील, रुपा खांडेकर व अधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी : चंदगड येथे आदर्श अंगणवाडी सेविका विद्या माडूळकर यांचा सत्कार मान्यवरांनी केला.
क्रमांक : ०८०७२०२१-गड-०८