कोल्हापूर : पूर व अतिवृष्टीग्रस्त भागांतील पदवीधरांचे शैक्षणिक कर्ज पूर्णपणे माफ करावे, अशी मागणी रुकडीचे माजी उपसरपंच अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.
भोसले यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. महापूर व अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्याची ऐपत राहिलेली नाही; त्यामुळे कर्जमाफी करून त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करावा, अशी विनंतीही भोसले यांनी केली.
याशिवाय पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील नावनोंदणीच्या बाबतीत सुटसुटीतपणा आणावा, अशीही मागणी केली. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीआधी मतदार नोंदणी अभियान राबविताना लावलेले नियम व अटी फारच किचकट आहेत. त्यामुळे नोंदणीसाठी अजिबात प्रतिसाद मिळत नाही. याशिवाय ज्या-त्या शिक्षण संस्थांतील शिक्षक आणि विद्यापीठातून पदवीधरांच्या याद्या मागवून घेऊन त्याच निवडणूक आयोगाकडे सादर करून वेळ, पैसा व श्रम वाचवावेत, असेही भोसले यांनी सूचित केले.