कोल्हापुर- लॉकडाऊनच्या काळातील विजेचे बिल माफ करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला.सोमवारी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यावेळी शेट्टी बोलत होते.
कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळपासून सर्वपक्षीय राज्यस्तरीय आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये राजू शेट्टी यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. कार्यकर्त्यांनी संपूर्ण वीज बिल माफ करावे, अन्यथा इलेक्ट्रिक शॉक राज्य सरकारला देऊ अशा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे .कोरोना काळात हाताला रोजगार नाही, काम नाही, अशा स्थितीत विजेचे दर सरकारने वाढवले आहेत. हे पैसे कसे भरायचे, असा सवाल शेट्टी यांनी केला. महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरु आहे, रीडिंगही गेल्या वर्षीच्या सरासरीने काढले आहे, त्यामुळे स्थिर आकारही वाढला आहे, त्यामुळे वीज बिल वाढून आला आहे. क्रिकेट पटू पासून सामान्य नागरिकांपर्यंत वीज बिल वाढलेले आहे. यामुळे वीज वितरण कंपनी हि चेष्टेचा विषय बनली आहे, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.या सर्वपक्षिय राज्यस्तरीय आंदोलनात अनेकांनी महावितरण कंपनीवर टीका केली. लॉकडाऊनच्या काळातील म्हणजे एप्रिल, मे आणि जून महिन्यातील विजेचे संपूर्ण बिल माफ करा, अशी मागणी या आंदोलनात अनेकांनी केली आहे.
वीज ग्राहक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रताप होगाडे म्हणाले, अडचणीच्या काळात गुजरात, कर्नाटक, हरियाणा, मध्यप्रदेश राज्यांनी पॅकेज देऊन तेथील जनतेला दिलासा दिला. येथे केंद्र सरकार व राज्य सरकारने काय केले. येथे पोट भरायसाठी पैसे नसताना बिले भरायची कुठून? तीन महिन्यांचे ३०० युनिटपर्यंतचे संपूर्ण बिल माफ करायचे म्हटले तर ४५०० कोटी रुपये लागतील.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, बाबा पार्टे, प्रा. जालंदर पाटील, बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी, सुभाष देसाई, दिलीप देसाई, संभाजीराव जगदाळे आदी उपस्थित होते. दरम्यान, दुपारी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.