महागाव : कोरोनाच्या संकट काळात उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असतानाही मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीचा तगादा लावला आहे. कंपन्यांनी कर्जवसुली तात्काळ थांबवावी आणि शासनाने मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जे माफ करावीत, या मागणीसाठी महागाव (ता. गडहिंग्लज) येथील पाच रास्ता चौकात आंदोलन करण्यात आला.जनता दल आणि मायक्रो फायनान्स कृती समितीतर्फे फायनान्स कंपन्यांच्या कर्जदार महिला बचत गट आणि गोरगरीब महिलांनी केलेल्या आंदोलनामुळे गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली. माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.शिंदे म्हणाले, खाजगी मायक्रो फायनान्स कंपन्यांचा सावकारी धंदा सुरू आहे. त्यांच्या व्याज आकारणीची चौकशी व्हावी, ज्या कर्जदारांनी ज्यादा व्याज भरले आहे त्यांना ते परत द्यावे. संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदार व फायनान्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घ्यावी.यावेळी परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणीसाठी दौºयावर आलेले माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही आंदोलनास पाठिंबा दिला. खोत म्हणाले, महिला बचत गटांची मायक्रो फायनान्स कंपन्या आणि बँकेकडील कर्जे कोणत्याही परिस्थितीत माफ झाली पाहिजेत. यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र घेवून हा प्रश्न अधिवेशनात मांडू. बाळेश नाईक म्हणाले, तालुक्यातील हलकर्णी, नूल येथेही मेळावे घेवून मोर्चे काढणार आहे.यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, प्रशांत पाटील, संजय कांबळे, संजय रेडेकर, विद्या कांबळे, नूरजहाँ सनदी, धीरज देसाई, सागर कांबळे यांचीही भाषणे झाली. आंदोलनात उदय कदम, दिलीप कांबळे, कृष्णराव रेगडे, नितीन पाटील, बाळकृष्ण परीट, हिंदूराव नौकुडकर, तानाजी कुराडे, पप्पू सलवादे, बापूसाहेब कांबळे, शशीकांत चोथे, चाळू पाटील, शोभा भोगूलकर, रंजना शिंदे, महादेवराव शिंदे, चंद्रकांत कांबळे आदींसह बचत गट, कर्जदार महिला सहभागी झाल्या होत्या.