कोल्हापूर : वृत्तपत्र विक्रेता, एजंट, पायलट, वार्ताहर तसेच वृत्तपत्र व्यवसायातील इतर घटक यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे या मागणीसाठी कोल्हापुरात आज, गुरुवारी वृत्तपत्र विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने विक्रेते सहभागी झाले होते. आपली मागणी मान्य करुन घेण्यासाठी सरकार विरोधात टोकाचा संघर्ष करावा लागला तरी मागे हटायचे नाही, असा निर्धार मोर्चाच्यावतीने करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंटस् असोसिएशनच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मार्चाला टाऊन हॉल बागेतून सुरवात झाली. भर उन्हात दुपारी एक वाजता सुरु झालेला मोर्चा शहाराच्या प्रमुख मार्गावरुन फिरुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचला. मार्चात कल्याणकारी मंडळाची स्थापना झालीच पाहिजे, कल्याणकारी मंडळ आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, आवाज दो हम एक है अशा सूचनांनी मोर्चाचा मार्ग दूमदूमून गेला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर छोट्या सभेत झाले. यावेळी रघुनाथ कांबळे, भरमा कांबळे, दत्ता माने, शिवाजी मगदूम यांची भाषणे झाली. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन होईपर्यंत आपला लढा सुरु ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. प्रसंग पडलाच तर हा लढा अधिक तीव्र करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. कोल्हापुरातून आंदोलन सुरु झाले की त्याचा वणवा राज्यभर पेटतो हा इतिहास आहे. म्हणूनच आज सुरवात झाली आहे, संपूर्ण राज्यभर विक्रेत्यांचे आंदोलन करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा, वृत्तपत्र विक्रेत्यांचा कोल्हापुरात मोर्चा
By भारत चव्हाण | Published: March 02, 2023 3:44 PM