कोल्हापूर : सिडनी (आॅस्ट्रेलिया) येथे १० ते १९ आॅक्टोबर दरम्यान होणाऱ्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कोल्हापूरच्या स्वरूप महावीर उन्हाळकर याची निवड झाली. महाराष्ट्रातून निवड झालेला तो एकमेव पॅरा नेमबाज आहे.ओसिजेक, क्रोएशिया येथे २२ ते ३१ जुलै दरम्यान झालेल्या आयपीसी नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात प्राथमिक पात्रता फेरीत त्याने ६१५.२ गुण मिळवून चौथे स्थान पटकावित अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत त्याने २२३.१ गुणांसह वैयक्तिक विक्रमाचीही नोंद केली. यात त्याने पहिले आंतरराष्ट्रीय कांस्यपदकही पटकाविले.
या कामगिरीवर त्याची सिडनी येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेतून त्याला २०२० ला टोकियो येथे होणाऱ्या पॅराआॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र होण्याची संधी मिळणार आहे. तो या स्पर्धेत १० मीटर एअर रायफल व १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत त्याने अवनी लखेरासोबत व वैयक्तिक अशा दोन प्रकारांत सहभागी होणार आहे.
त्याला कोल्हापुरात प्रशिक्षक अजित पाटील व युवराज साळोखे, तर पुणे (बालेवाडी) येथे आॅलिम्पिक विजेता गगन नारंग व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक युनियात्री इलियास, किरण खंडारे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पॅरालिम्पिक असोसिएशन व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मेन अँड वुमेन असोसिएशन, गन फॉर ग्लोरीचे पवन सिंग, दिलीप कांबळे, शुक्ला बिडकर, अनिल पोवार, आर. डी. आरळेकर, प्रा. शंकरराव कुलकर्णी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.