कोल्हापूर : कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय पॅरा नेमबाज स्वरूप उन्हाळकर २०२० मध्ये टोकियो (जपान) येथे होणाऱ्या पॅरा आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्याच्या रूपाने भारतीय संघाला पाचवे तिकीट मिळाले, तर सुवर्णकन्या राही सरनोबत हिच्यानंतर असे तिकीट मिळविणारा तो दुसरा नेमबाज ठरला.स्वरूपने या कामगिरीत १० ते १९ आॅक्टोबर दरम्यान आॅस्ट्रेलिया येथे झालेल्या पॅरा विश्व नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक व मिश्र दुहेरीत प्राथमिक फेरीत ६१५.२ गुण मिळविले. या गुणांच्या जोरावर त्याला पॅरा आॅलिम्पिक स्पर्धेतील स्थान निश्चित करता आले. त्याची कामगिरी पात्रता निकषास पात्र ठरली.
स्वरूपने यापूर्वी झालेल्या सात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला होता, तर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चार सुवर्ण, चार रौप्य व दोन कांस्यपदके पटकाविले. त्याला कोल्हापूर डिस्ट्रीक्ट पॅरालिम्पिक असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा मेन अँड वुमेन असोसिएशन व प्रशिक्षक अजित पाटील, युवराज साळोखे, पुणे येथे आॅलिम्पियन गगन नारंग, किरण खंडारे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.