समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांबाबत अभ्यास करण्याकरिता अभ्यासगटाची नेमणूक करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत आदेश मंगळवारी काढला आहे.
माहिती वृत्त व जनसंपर्कचे संचालक, नागपूर आणि औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयांचे संचालक, माहिती उपसंचालक, वित्त विभागाचे उपसचिव किंवा अवर सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव किंवा अवर सचिव हे शासकीय र राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हे या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तर तीन दैनिकांचे प्रतिनिधींची शासन नामनिर्देशित सदस्य म्हणू नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिस्वीकृती पत्रिकांची व्याप्ती संख्या वाढवणे, डिजिटल माध्यमांसंबंधी निकष ठरविणे, याबाबत केंद्र शासनाच्या धोरणाचा अभ्यास करून त्यानुसार राज्याच्या धोरणात सुधारणा करणे, प्रेस क्लब नागपूर यांचा अभ्यास करून त्या धर्तीवर राज्यातील अन्य महत्वाच्या ठिकाणी प्रेस क्लबची उभारणी करणे, पत्रकारांना शासकीय रूग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी धोरण तयार करणे, त्यांच्यासाठी कॅशलेस वैद्यकीय विमा योजना तयार करणे यासह अन्य महत्वाच्या बाबींचा अभ्यास करणे यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.