कोल्हापूर : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी अखेर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आज, शुक्रवारी अर्ज दाखल केला. गेली पंधरा-वीस दिवस त्यांची मनधरणी सुरु होती, मात्र त्यांनी पक्षाकडून सामान्य कार्यकर्त्यांना बेदखल केले जात असून स्वाभिमानासाठी रिंगणात उतरल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते अनेक वेळा भावूक झाले.सांगरुळ (ता. करवीर) येथील बाजीराव खाडे हे गेली २८ वर्षे काँग्रेस पक्षात सक्रीय आहेत. त्यांनी युवक काँग्रेस पासून काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहिले. त्यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विविध राज्यांची जबाबदारीही दिली होती. दीड वर्षापुर्वी त्यांनी लोकसभा निवडणूकीची तयारी सुरु केली. गेल्या सहा महिन्यात तर त्यांनी वाड्यावस्त्या व गावे पिंजून काढली होती. काँग्रेस पक्षात कोणीच इच्छुक नसल्याने मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्यानंतर नेतृत्व आपला विचार करेल, या अपेक्षेने त्यांनी जोमाने काम चालू ठेवले. पण, काँग्रेसने शाहू छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली तरीही खाडे थांबले नाहीत. दरम्यानच्या काळात स्थानिक काँग्रेस नेत्यांसह निरीक्षक, महाराष्ट्राचे प्रभारी यांनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. पण, त्यांचे मन वळवण्यात अपयश आले. अगदी शेवटच्या क्षणी अर्ज दाखल केला.
पक्षात २८ वर्षे काम करुनही दखल घेतली नाही. सामान्य कार्यकर्त्यांनी आणखी किती वर्षे काम करत रहायचे. काँग्रेस पक्षातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी रिंगणात उतरलो आहे. - बाजीराव खाडे