‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत
By राजाराम लोंढे | Published: April 24, 2024 04:29 PM2024-04-24T16:29:13+5:302024-04-24T16:29:51+5:30
कोल्हापूर : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे (सांगरुळ, ता. करवीर) यांना पक्षातून सहा वर्षासाठी आज, बुधवारी निलंबीत करण्यात ...
कोल्हापूर : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे (सांगरुळ, ता. करवीर) यांना पक्षातून सहा वर्षासाठी आज, बुधवारी निलंबीत करण्यात आले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी बुधवारी ही कारवाई कारवाईचे आदेश काढले.
बाजीराव खाडे हे ‘कोल्हापूर’मधून इच्छुक होते. त्यांनी गेल्या सहा महिने संपर्क मोहीम राबवली होती. मतदारसंघात सगळीकडे त्यांनी बॅनरबाजी करत वातावरण तयार करण्यास सुरुवात केली होती. पण, पक्षाने शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांना थांबण्याचा सल्ला पक्षश्रेष्ठींनी दिला होता. तरीही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी
रमेश चेन्नीथला, जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
पण, उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहिले आणि त्यानंतर प्रसारमाध्यमातून काँग्रेस नेतृत्वावर थेट हल्ला चढवला. त्यामुळे पक्षाने त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत करण्याचा निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी त्यांच्यावर कारवाई केली.
खाडे यांनी युवक काँग्रेस ते राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहिले होते. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात होते. सध्या ते काँग्रेसचे सहयोगी प्रदेश प्रतिनिधी होते.