मिरज : मिरजेतील ईदगाहनगर येथे हल्ल्यात गंभीर जखमी झालेले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक इब्राहीम चौधरी यांचा उपचारादरम्यान कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला. चौधरी यांच्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेल्या समीर ख्वाजा शेख (वय २१), ख्वाजा कलंदर शेख (५०), अमीर ख्वाजा शेख (२०), नौशाद कलंदर शेख (३७), जमीर सलीम शेख (१९, रा. ईदगाहनगर, मिरज) या पाचजणांविरुध्द गांधी चौकी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईदगाह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ईदगाहनगर येथे शुक्रवारी रात्री हुसेन कोन्नूर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास माजी नगरसेवक इब्राहीम चौधरी, आरिफ चौधरी व नगरसेवक जुबेर चौधरी हे पिता-पुत्र गेले होते. तेथे काँग्रेस नगरसेविकेचा पुत्र समीर मालगावे याचा वाहनचालक नौशाद कलंदर शेख आला होता. इब्राहिम चौधरी यांनी नौशादला ‘थोडे बाजूला थांब’ असे म्हटल्याने त्यांच्यात वादावादी झाली होती. घरी जात असताना नौशाद व त्याचा भाऊ ख्वाजा शेख यांनी त्यांना शिवीगाळ केल्याने इब्राहीम चौधरी, आरिफ चौधरी, जुबेर चौधरी हे नौशाद व ख्वाजा शेख यांना जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर शेख बंधू व त्यांच्या मुलांनी चौधरी यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात समीर ख्वाजा शेख याने डोक्यात लोखंडी पहारीने हल्ला केल्याने इब्राहिम चौधरी जागीच कोसळले. जमीर सलीम शेख याने डोक्यात लोखंडी सळीने हल्ला केल्याने आरिफ चौधरी हेसुध्दा जखमी झाले. जखमी इब्राहीम चौधरी व आरिफ चौधरी यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डोक्यास गंभीर मार लागल्याने इब्राहीम चौधरी यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव दुपारी तीन वाजता कोल्हापूरहून मिरजेला आणण्यात आले. नागरिकांच्या गर्दीमुळे अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव दोन तास घरासमोर ठेवण्यात आले. महापालिकेचे नगरसेवक, अधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर ईदगाह येथील कब्रस्थानात अंत्यसंस्कार करण्यात आले. चौधरी यांच्या मृत्यूमुळे पोलिस कोठडीत असलेल्या समीर शेख, ख्वाजा शेख, अमीर शेख, नौशाद शेख, जमीर शेख यांच्याविरुध्द गांधी चौकी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचजणांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. (वार्ताहर) चौकट भारतनगरमध्ये तणाव शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक इब्राहीम चौधरी यांचा कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांनी चौधरी यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने ईदगाहनगर, भारतनगर परिसरासह नगरसेविका बेबीताई मालगावे यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जोड आहे... इब्राहीम चौधरी बातमीला जोड... चौकट दोनदा नगरसेवक, एकदा सभापती इब्राहीम चौधरी दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मिरज नगरपालिकेत १९८५ मध्ये नगरसेवक म्हणून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. १९९० च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, पण ते मिरज शिक्षण मंडळावर निवडून गेले होते. १९९५-९६ मध्ये त्यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने त्यांच्या पत्नी निवडून आल्या. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची स्थापना झाल्यानंतर त्यांनी पुन्हा निवडणूक लढविली. पण ते पराभूत झाले. २००३ मध्ये पुन्हा ते काँग्रेसच्या तिकिटावर महापालिकेत निवडून आले. २००८ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत प्रवेश केला, पण त्यांचा पराभव झाला. मात्र या निवडणुकीत दुसऱ्या प्रभागातून त्यांचे पुत्र आरिफ चौधरी निवडून आले. महाआघाडीच्या काळात त्यांनी महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य, सभापती म्हणून काम पाहिले. २०१३ च्या निवडणुकीत त्यांचा अर्ज छाननीत बाद ठरला. त्यांच्या जागी त्यांचे पुत्र जुबेर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. यात जुबेर चौधरी निवडून आले.
जखमी माजी नगरसेवक इब्राहीम चौधरी यांचा मृत्यू
By admin | Published: April 10, 2017 8:41 PM