कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केलेल्या एखाद्या माजी नगरसेवकाला आमदार होण्याची संधी तब्बल ३२ वर्षांनी मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदार संघातून कोण विजयी होणार याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व केलेल्या एका माजी नगरसेवकाला आमदार व्हायची संधी चालून आली आहे. याआधी अशी संधी केवळ शिवसेनेच्या स्वर्गीय दिलीप देसाई यांना मिळाली होती.
कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौरपद भूषविले की त्या पदाधिकाऱ्यास शहराचे आमदार होण्याची स्वप्ने पडू लागतात. महापौर होताच काही राजकीय कार्यकर्ते त्या दृष्टीनेच मिळालेल्या पदाचा उपयोग करीत असतात; परंतु आतापर्यंत तरी माजी महापौरांना आमदार होण्याची संधी मिळालेली नाही. माजी महापौर महादेवराव आडगुळे, आर. के. पोवार यांनी निवडणूक लढविली होती; पण त्यांना पराभवास सामोरे जावे लागल्याने त्यांना आमदार होता आले नाही.
तत्कालीन नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम पाहिलेल्या दिवंगत सखारामबापू खराडे व दिवंगत गोविंद पानसरे यांनाही आमदारकीची निवडणूक लढविण्याची संधी मिळाली; पण विजयी होता आले नाही. त्यामुळे नगरसेवक तसेच महापौर झालेल्या व्यक्ती आमदार होत नाहीत, असा एक सर्वसाधारण समज गेल्या वीस-पंचवीस वर्षांत तयार झाला होता.
परंतु शिवसेनेचे स्वर्गीय दिलीप देसाई हे मात्र नगरसेवक झाल्यानंतर आमदारकीची निवडणूक लढवून विजयी झाले होते. देसाई यांचा एकमेव अपवाद वगळता, नगरसेवक अथवा माजी महापौर आमदार झालेले पाहायला मिळाले नाही. आता तब्बल ३२ वर्षांनंतर पुन्हा एका माजी नगरसेवकाला आमदार होण्याची संधी मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव या भाजपच्या, तर सत्यजित कदम हे ताराराणी आघाडीचे नगरसेवक होते. विशेष म्हणजे महानगरपालिकेतील २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या काळात भाजप व ताराराणी आघाडीची युती होती आणि जाधव-कदम एकत्रच काम करत होते.
नगरसेवक नाही, आमदारच झाले
दिवंगत त्र्यं. सी. कारखानीस, दिवंगत प्रा. एन. डी. पाटील, दिवंगत लालासाहेब यादव, सुरेश साळोखे, मालोजीराजे छत्रपती, राजेश क्षीरसागर, दिवंगत चंद्रकांत जाधव कोल्हापूर शहरातून आमदार झाले; परंतु त्यांनी कधीही महानगरपालिकेची निवडणूक लढविली नाही.