कोल्हापूर : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरातील पाणीपुरवठा नियोजन कोलमडले असून ते जर येत्या गुरुवार (दि.३०) पर्यंत सुरळीत करा. अन्यथा जल अभियांत्यांसह अधिकारी कर्मचाऱ्यांना साडी चोळीचा आहेर माजी महिला नगरसेविका करतील. यासह महापालिकेने पंप दुरुस्ती देखभालीकरीता उर्वरित तीन कोटीचा स्वनिधी मंजूर केला नाहीतर त्यासाठी आम्ही भीक मांगो आंदोलन करू असा इशारा देत माजी नगरसेवकांनी गुरुवारी जल अभियंता हर्षजित घाटगे यांना तब्बल दोन तास घेराव घातला.शहराच्या सर्वच भागात पाणीपुरवठा असमतोल होत आहे. त्यामुळे अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. तर काही भागात अत्यल्प होत आहे. याशिवाय एस.एस.सी बोर्ड, म्हाडा कॉलनीत रात्री बारानंतर मैलामिश्रीत पाणी पुरवठा होत आहे. पोलिस लाईन, लाईन बझार, न्यू पॅलेस परिसर, राजारामपुरी , रायगड कॉलनी, मंगळवार पेठ, आझाद गल्ली, राजेंद्रनगर, शेंडा पार्क, अकबर मोहल्ला, सुभाषनगर, आदी कळंबा फिल्टर हाऊस, आदी परिसरातील नागरीक पाणी मिळत नाही म्हणून आमच्याकडे येऊन आम्हाला त्रास देत आहेत. असा आरोप करीत माजी नगरसेवकांनी जलअभियंता हर्षजित घाटगे, शाखा अभियंता प्रिया पाटील, आदी अधिकारी कर्मचाऱ्यांना तब्बल दोन तास घेराव घालून धारेवर धरले. किमान प्रत्येक वार्ड, प्रभागाला चार तास पाणीपुरवठा झालाच पाहीजे, अशी मागणी केली. यावर जल अभियंता घाटगे यांनी अपुरा पाणीपुरवठ्याबाबतचा अहवाल वाचून दाखविला. त्यावर समाधान न झाल्याने माजी नगरसेवकांनी आमच्या प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत करा. असे अधिकारी कर्मचाऱ्यांना रुजवात घालत जाब विचारला. यावर जल अभियंता घाटगे यांनी पाणी डिस्चार्ज कमी दाबाने होते. याची तपासणी करून उपाय योजना त्वरीत करू. शिंगणापुर, बावडा येथील पंप हाऊसचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव देऊ, जिथे व्हाॅल्व बदलावे लागतात, तेथे बदलू, येत्या गुरुवारपर्यत सर्व शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले.
यावेळी शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, विनायक फाळके, आदील फरास, माजी महापौर निलोफर आजरेकर, प्रज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, जय जाधव, सचिन पाटील, दुर्वास कदम, शांकी मगदूम, अश्किन आजरेकर, राजाराम गायकवाड, भूपाल शेटे आदीं उपस्थित होते.