कोल्हापूर : क्रिकेट खेळ सोपा नाही, त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. केवळ क्रिकेटच्या मागे न धावता अभ्यासही केला पाहिजे. खेळ आणि अभ्यास यांची सांगड घातली तर यश नक्की मिळेल, असा कानमंत्र भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू करसन घावरी यांनी मंगळवारी दिला. शास्त्रीनगर मैदान तयार करणाऱ्या काका पाटील यांचे त्यांनी कौतुक केले.पॅकर्स क्रिकेट क्लबमार्फत २५ वर्षांखालील निमंत्रितांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धा बुधवारपासून सुरू होत आहेत. या स्पर्धेच्या चषक अनावरण समारंभासाठी कोल्हापुरात आलेले करसन घावरी आणि आणि महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ यांनी शास्त्रीनगर येथील क्रिकेट मैदानाला सकाळी भेट दिली. या कार्यक्रमात कोल्हापुरातील सुमारे ५० ते ६० उदयोन्मुख क्रिकेटपटूंशी संवाद साधला.घावरी यांनी आपल्या भाषणात १९६९ मध्ये या मैदानावर महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्रकडून खेळल्याच्या, तर महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ यांनी १९८४ ते १९८८ या कालावधीत पॅकर्स क्रिकेट क्लबच्या चार टूर्नामेंटमध्ये खेळल्याच्या आठवणी सांगितल्या.पॅकर्स क्रिकेट क्लब आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. उदयोन्मुख खेळाडू वेदांत पाटील आणि मधुरा इंगवले यांनी त्यांचे स्वागत केले.उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. पॅकर्सचे अध्यक्ष सुधीर पारखे, रणजीपटू मिलिंद कुलकर्णी, सचिव नंदकुमार बामणे, विजय साेमाणे, राजू सोमाणे, काका पाटील, राजू नागेशकर, शैलेंद्र राजेशिर्के उपस्थित होते.
खेळपट्टीचे केले कौतुकशास्त्रीनगर येथील खेळपट्टी आणि मैदान पाहून करसन घावरी आणि गुंजाळ यांनी येथे रणजी सामने घेता येतील, असे सांगून कौतुक केले. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्टीचा उदयोन्मुख खेळाडूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. हे मैदान तयार करणाऱ्या काका पाटील यांचा त्यांनी सत्कार केला.