कोल्हापूर : जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना विविध योजनांमधून जी कामे सुचवली ती बदलून अन्य कामे धरल्याबद्दल पालकमंत्री दीपक केसरकर यांना जाब विचारण्याचा माजी जिल्हा परिषद सदस्यांनी घेतला आहे.
सर्वपक्षीय माजी जिल्हा परिषद सदस्यांची जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये सोमवारी बैठक झाली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या अनेकांनी जिल्हा नियोजन समिती, जन सुविधा, नागरी सुविधा, क वर्ग पर्यटन स्थळ, ३०५४, अंगणवाडी बांधकाम, दुरुस्ती, शाळा बांधकाम ,दुरुस्ती यासाठी विविध प्रस्ताव दिले होते. जिल्हा नियोजन समितीचा निधी हा पालकमंत्र्यांकडे एकवटला गेला. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत खासदार आणि आमदारांची चर्चा करून निधी वाटप करूनही टाकले आहे. परंतु यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांनी सुचवलेली कामे वगळण्यात आल्याचा आरोप यावेळी अनेक सदस्यांनी केला.
आम्ही आमच्या मतदारसंघात काम करत असताना गरजेची अनेक विकास कामे सुचवली होती ती डावलून ठेकेदारांनी सुचवलेली कामे अनेक ठिकाणी धरण्यात आली आहेत असा आरोपही यावेळी करण्यात आला. याबाबत आम्ही केसरकर यांना कोल्हापूर दौऱ्यानंतर आल्यानंतर जाब विचारणार आहोत असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष बजरंग पाटील, राहुल पाटील, माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, अंबरीश घाटगे, राजू मगदूम, मनोज फराकटे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.