कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे त्रिपुरा, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना यावर्षीच्या ‘प्राचार्य रा. कृ. कणबरकर’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख ५१ हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. या पुरस्काराचे वितरण दि. १३ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता विद्यापीठात होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठीच्या प्रमुख पाहुण्यांचे नाव लवकरच निश्चित केले जाणार आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कणबरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराची निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी विद्यापीठाला २५ लाख रुपयांची ठेव सुपुर्द केली. त्यातून विद्यापीठाने सन २०१४ मध्ये प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्काराची निर्मिती केली. त्यानंतर या पुरस्काराने प्रा. सी. एन. राव, रयत शिक्षण संस्था, डॉ. जब्बार पटेल, एन. डी. पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे पुरस्कार रद्द करण्यात आला. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षणक्षेत्रात माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी नवे शैक्षणिक प्रमाण निर्माण केले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासह गरजूंच्या शिक्षणाला बळ देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. या कार्याची दखल घेऊन या कणबरकर पुरस्कारासाठी त्यांची निवड एकमताने झाली आहे, असे पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. जे. एफ. पाटील यांनी सांगितले. यावेळी डॉ. भालबा विभुते, अरुण कणबरकर, डी. ए. खोत, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलचिव वैभव ढेरे उपस्थित होते.
विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदानमाजी राज्यपाल डॉ. पाटील यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, राजकीय क्षेत्रातील कार्यासह शिक्षण, आरोग्यसेवेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिक्षण, आरोग्य सेवा सर्वांसह गरजू, वंचितांना उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न त्यांनी आजपर्यंत केले आहेत. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी, प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष असून त्यांच्या या माध्यमातून १७२ हून अधिक शैक्षणिक संस्था देशभरात कार्यरत असल्याचे डॉ. जे. एफ. पाटील यांनी सांगितले.