कोल्हापूर : जुन्या पिढीतील ज्येष्ठ क्रिकेटपटू व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव मोहनराव भाऊसाहेब भुईंबर (७६) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते असोसिएशनचे विद्यमान संचालक रोहन भुईंबर यांचे वडील होत.
मोहनराव यांचा जन्म ३० जानेवारी १९४५ला आजरा येथे झाला. शालेय शिक्षण ब्रँच राजाराम हायस्कूल येथून झाले. या काळात त्यांना क्रिकेटची गोडी लागली. स्थानिक संघातून खेळताना त्यांनी यष्टीरक्षक आणि फलंदाजीत चुणूक दाखवत तत्कालीन सोनटक्के शिल्ड, दाभोळकर शिल्ड स्पर्धा गाजविल्या. महाविद्यालयीन स्पर्धेत खेळताना पहिल्याच सामन्यात नाबाद १७१ धावांची दीडशतकी खेळी केली. याच जोरावर शिवाजी विद्यापीठाच्या क्रिकेट संघात फलदांज यष्टीरक्षक म्हणून स्थान पटकावले होते.
स्थानिक क्रिकेट खेळताना शाहुपुरी जीमखाना संघाचे त्यांनी सलग १० वर्षे कर्णधारपद भूषविले. मोहनरावांची क्रिकेटबद्दलची तळमळ पाहून स्वर्गीय डी. आर. पाटील व राजाभाऊ करंदीकर यांनी त्यांची कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संचालकपदी निवड केली. त्यांनी १९७८ ते २००२ सालापर्यंत संचालक म्हणून काम पाहिले. या दरम्यान १९८० साली त्यांनी असोसिएशनच्या सेक्रेटरीपदाची धुरा सांभाळली. याच काळात भारतीय संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे गौरवनिधी सामना, वेस्ट इंडीज विरूध्द वेस्ट झोन, श्रीलंका विरूध्द २५ वर्षाखालील भारतीय संघ व अनेक रणजी सामने आयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी शाहुपुरी जीमखान्याचे सचिव म्हणूनही कारभार पाहिला होता. ते एक उत्तम प्रशासक, स्पष्टवक्ता, मितभाषी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना जिल्हा क्रिकेट असोसिएशनने १५ ऑगस्ट २०१७ रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सन्मानपत्र देऊन गौरविले होते.
प्रतिक्रिया
मोहनराव यांच्या जाण्याने एक इनिंगचा अंत झाला. कायम असोसिएशनच्या प्रगतीचा विचार त्यांनी केला. त्यांच्या सचिव काळात अनेक दैदिप्यमान कामगिरी केडीसीएने केली. त्यांच्या जाण्याने एक मितभाषी उत्तम प्रशासक आणि माझ्या जवळचा नव्हे तर कुटुंबातील एक व्यक्ती हरपला.
आर. ए. तथा बाळ पाटणकर
माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन
फोटो ७०६२०२१ कॉल मोहनराव भुईंबर (निधन)