कोल्हापूर : हुपरी रोडवरील अभिषेक स्पिनिंग मिल्समध्ये गुंतवणूक केलेली रक्कम परत मागण्यासाठी मंगळवारी माजी आमदारप्रकाश आवाडे हे कुलूप तोडून आत घुसले. कर्मचारी कुलूप काढत नाहीत म्हटल्यावर कुलूप तोडा, मला कोण काय करते बघूयाच असे ते म्हणत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यासंदर्भात गोकुळ शिरगाव पोलिसांत रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद झाली नव्हती, परंतु घडलेला प्रकार पोलिस अधीक्षकांना कळवण्यात आल्याचे व ११२ क्रमांकावर माहिती दिल्याचे मिल्सच्या वतीने सांगण्यात आले.मिल्सकडून दिलेली माहिती अशी : या मिल्सचे भागीदार अण्णासाहेब मोहिते यांना साधारणत: २०१९ च्या अगोदर या मिल्ससाठी आर्थिक गरज होती. म्हणून त्यांनी तत्कालीन आमदारप्रकाश आवाडे यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी त्यांच्या बँकेतून कर्ज द्यावे, अशी मागणी केली. परंतु आवाडे यांनी तसे न करता स्वत:जवळील ४ ते ५ कोटी रुपये या प्रकल्पामध्ये गुंतवले व प्रकल्पाचे भागीदार झाले. त्याच दरम्यान इचलकरंजीतील एका वकिलाने उच्च न्यायालयात प्रकल्पासंबंधी तक्रारी केल्या. त्यामुळे प्रकल्प सुरू होण्यास अडचणी आल्या. कोरोनामुळे त्यात भर पडली. त्याचा निकाल मिल्सच्या बाजूने लागला. परंतु नंतर करावी लागणारी गुंतवणूक न करता ते भागीदारीतून बाहेर पडले. त्यामुळे हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालला नाही. तोपर्यंत स्वत: मोहिते यांचेही निधन झाले. मी केलेली गुंतवणूक व्याजासह परत करावी, असे आवाडे यांची मागणी आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्यांनी त्यासाठी तगादा लावला आहे. परंतु पैसे न मिळाल्याने मंगळवारी कुलूप तोडून मिल्समध्ये घुसले. तेथील कामगारांशी त्यावरून थोडी वादावादी झाली. त्यामुळे कामगारांनी ११२ क्रमांकावर माहिती दिली. पोलिस आले तेव्हा तिथे कोणही नव्हते.
हा आमचा घरगुती मॅटर आहे. त्यामध्ये बातमी देण्यासारखे काही नाही. - प्रकाश आवाडे, माजी आमदार इचलकरंजी